Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Amravati : धोकादायक विद्युत यंत्रणेकडे महावितरणचे दुर्लक्ष; अपघाताचा धोका वाढला

Amravati : धोकादायक विद्युत यंत्रणेकडे महावितरणचे दुर्लक्ष; अपघाताचा धोका वाढला

Amravati अमरावती शहरासह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी महावितरणच्या विद्युत यंत्रणेची अवस्था धोकादायक बनली असून तिरपे विद्युत खांब, झाडांच्या फांद्यांमधून गेलेल्या वीजतारा आणि वेलींनी वेढलेले खांब यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी या धोकादायक यंत्रणेची तातडीने दुरुस्ती व आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (Amravati)

पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून विद्युत वाहिन्यांची पाहणी, झाडांच्या फांद्यांची छाटणी, तिरपे विद्युत खांब सरळ करणे, आवश्यक ठिकाणी नवीन खांब उभारणे तसेच लोंबकळलेल्या तारांची दुरुस्ती करण्याची अपेक्षा असते. मात्र, पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटूनही शहर आणि ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी विद्युत यंत्रणेची स्थिती जैसे थे असल्याचे वीजग्राहकांचे म्हणणे आहे. (Amravati)

अनेक ठिकाणी वीजतारा थेट झाडांच्या फांद्यांमधून गेल्या आहेत. वाऱ्यामुळे फांद्या तारांना घासल्यास किंवा त्या तारांवर पडल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासोबतच शॉर्टसर्किटचा धोका निर्माण होऊ शकतो. पावसाळ्यात झाडे आणि विद्युत वाहिन्यांचा संपर्क अधिक धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने महावितरणने तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. (Amravati)

वारंवार वीजखंडितीने नागरिक त्रस्त

गेल्या काही महिन्यांत विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढल्याने घरगुती ग्राहकांसह दुकानदार, व्यावसायिक आणि अन्य वीजग्राहकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. झाडांच्या फांद्या विद्युत तारांना स्पर्श करीत असल्यानेही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. (Amravati)

त्यामुळे एका बाजूला विद्युत अपघाताचा धोका आणि दुसऱ्या बाजूला वारंवार होणारी वीजखंडिती, अशा दुहेरी समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. देखभाल-दुरुस्तीच्या कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात असून, वरिष्ठ अधिकारी या गंभीर बाबीकडे केव्हा लक्ष देणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Amravati)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post