प्रतिनिधी
Andheri Crime प्रवाशांच्या हातातील मोबाईल हिसकावणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे २८ महागडे मोबाईल आणि एक चोरीची दुचाकी हस्तगत केली आहे.
या कारवाईमुळे एमआयडीसीसह विलेपार्ले आणि गोरेगाव परिसरातील एकूण चार गुन्हे उघडकीस आले आहेत. (Andheri Crime)
मिळालेल्या माहितीनुसार, ६ जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास तक्रारदार प्रशांत कांबळे हे महाकाली गुंफा रोडवरून रिक्षानी प्रवास करत होते. यावेळी एका अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील ‘मोटोरोला’चा मोबाईल हिसकावून पळ काढला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Andheri Crime)
गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांचे पथक कसून तपास करत होते. तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आरोपी अंधेरी पूर्व येथील आंबेडकर नगर भागात येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे चोरीचा मोबाईल सापडला. अधिक चौकशी केली असता, त्याने आणखी २७ मोबाईल आणि एक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. (Andheri Crime)
आरोपीकडे सापडलेल्या २८ मोबाईलपैकी ३ मोबाईल विलेपार्ले पोलीस ठाण्यातील एका चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, त्याच्याकडे सापडलेली दुचाकी (MH 03 AU 3402) ही एमआयडीसी पोलीस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यात वापरल्याचे तपासात स्पष्ट झाले. याव्यतिरिक्त, त्याने गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मंदिरातील दानपेटी चोरी केल्याची कबुलीही दिली आहे. आरोपीकडून आतापर्यंत ४ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Andheri Crime)
आरोपीचा गुन्हेगारी इतिहास तपासला असता, त्याच्यावर यापूर्वीही आरे आणि टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे आणि सहायक पोलीस आयुक्त योगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, गुन्हे निरीक्षक सुनील करांडे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली आहे. (Andheri Crime)
