कल्याण, प्रतिनिधी
Assam Flood आसाममधील महापुरामुळे लाखो जनावरांसह पाळीव प्राणी संकटात सापडले आहेत. पूराचे पाणी ओसरत असताना आता प्राण्यांच्या बचावकार्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
जखमी, आजारी तसेच मानसिक तणावाखाली असलेल्या हजारो प्राण्यांसाठी वैद्यकीय शिबिरे आणि आपत्कालीन मदत मोहीम सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील पशू-पक्षांसाठी कार्य करणाऱ्या पॉज संस्थेने तब्बल ५० हजार रूपयांची औषधे आसामकडे पाठवली असल्याचे पॉजचे संस्थापक डॉ. निलेश भणगे यांनी सांगितले. (Assam Flood)
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, या पुरामुळे सुमारे ८.८२ लाख शेतातील व पाळीव प्राणी प्रभावित झाले आहेत. तर २६ हजार ५१२ प्राणी, ज्यामध्ये कुक्कुटपक्षी आणि पाळीव प्राण्यांचाही समावेश असून ते पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. या पार्श्वभूमीवर ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल, पॉज, जस्ट बी फ्रेंडली आणि आसामचे पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विभाग तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन मदतकार्य हाती घेतले आहे. शिवसागर आणि इतर बाधित जिल्ह्यांमध्ये जखमी व आजारी जनावरांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय शिबिरे सुरू आहेत. (Assam Flood)
आतापर्यंत १० हजारांहून अधिक प्रभावित प्राण्यांना उपचार, लसीकरण आणि आपत्कालीन मदत देण्यात आली आहे. पॉज संस्थेच्या वतीने सुमारे ५० हजार रूपयांची जीवनावश्यक औषधे पूरग्रस्त भागात पाठविण्यात आल्यामुळे वैद्यकीय शिबिरांना मोठी मदत झाल्याचे डॉ. निलेश भणगे यांनी सांगितले. पूरामुळे अडकलेल्या आणि भुकेल्या जनावरांसाठी तातडीने चारा आणि अन्न वाटप करण्यात येत आहे. तसेच पशुपालक कुटुंबांना हवामानापासून बचावासाठी ताडपत्रीचे पत्रे वितरित केली जात आहेत. प्राण्यांसोबतच त्यांच्यावर उपजीविकेसाठी अवलंबून असलेल्या कुटुंबांनाही सहाय्य पोहोचविले जात असल्याचे डॉ. भणगे यांनी सांगितले. (Assam Flood)
ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलासा
पॉज संस्थेचे संस्थापक डॉ. निलेश भणगे यांच्या मते, पूरानंतर प्राण्यांमध्ये संसर्गजन्य आजार, कुपोषण, जखमा आणि मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असते. अशा वेळी वेळेवर उपचार आणि चारा उपलब्ध करून दिल्यास हजारो प्राण्यांचे जीव वाचू शकतात आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही दिलासा मिळेल. पूरग्रस्त भागातील प्राण्यांचे संरक्षण आणि पुनर्वसन ही केवळ प्राणी कल्याणाची बाब नसून स्थानिक समुदायांच्या जीवनमानाशी निगडित अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे, असे मदत करणाऱ्या संस्थांनी म्हटले आहे. (Assam Flood)

