Dailyhunt

Bangladeshi Infiltration : हद्दपारीनंतरही घुसखोरांची मुंबईत पुन्हा 'डंकी' एन्ट्री!

  • संतोष वाघ

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र सध्या एका गंभीर सुरक्षा आव्हानाचा सामना करत आहे. हे आव्हान केवळ गुन्हेगारीचे नसून ते देशाच्या अंतर्गत सुरक्षेला खिंडार पाडणारे आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मागील काही महिन्यांत केलेल्या धडक कारवायांतून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे: ज्या बांगलादेशी नागरिकांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मोठ्या खर्चाने पुन्हा त्यांच्या मायदेशी पाठवले जाते, तेच नागरिक अवघ्या काही महिन्यांत पुन्हा चोरट्या मार्गाने मुंबईत दाखल होत आहेत.

हद्दपारीची ही प्रक्रिया जणू काही या घुसखोरांसाठी एक विरंगुळा ठरत असून, पोलिसांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात आहे. (Bangladeshi Infiltration)

भारताच्या तिजोरीवर आर्थिक भार

बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतल्यावर त्यांना लगेच तुरुंगात न टाकता 'डिटेंशन सेंटर'मध्ये ठेवले जाते. या केंद्रात त्यांच्या राहण्याचा, खाण्यापिण्याचा आणि त्यांच्या रवानगीसाठी लागणाऱ्या प्रवासाचा सर्व खर्च भारत सरकारला करावा लागतो. ही प्रक्रिया केवळ वेळखाऊ नसून मोठी आर्थिक हानी करणारी आहे. एका बाजूला भारत आपल्या साधनसंपत्तीतून या घुसखोरांवर खर्च करतो आणि दुसऱ्या बाजूला हेच घुसखोर 'एजंट्स'च्या मदतीने पुन्हा भारतात शिरून यंत्रणेची थट्टा करत आहेत. (Bangladeshi Infiltration)

घुसखोरीचे 'डंकी' नेटवर्क आणि मार्ग

घुसखोर भारतात कशा प्रकारे प्रवेश करतात, याचे जाळे अत्यंत गुंतागुंतीचे आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या सीमेचा मोठा भाग हा नद्या, जंगले आणि दलदलीचा आहे. या भागातील भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेत एजंट्स घुसखोरांना रात्रीच्या अंधारात सीमा ओलांडून देतात.

लाच आणि गुप्त मार्ग- तपासातून असे समोर आले आहे की, काही प्रकरणांत सीमा सुरक्षा कर्मचाऱ्यांना लाच देऊन किंवा अत्यंत दुर्गम जंगलमार्गांचा वापर करून ही माणसे भारतात शिरतात.

बनावट कागदपत्रांचा आधार- एकदा भारतात शिरले की, हे घुसखोर स्थानिक एजंट्सच्या मदतीने आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अगदी भारतीय पासपोर्टही मिळवतात. मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) नुकत्याच पकडल्या गेलेल्या एका व्यक्तीने चक्क २०१२ मध्ये घुसखोरी करून २०२२ मध्ये कोलकात्याच्या पत्त्यावर भारतीय पासपोर्ट मिळवला होता.

बेनापोल सीमेचा वापर-धारावी पोलिसांनी अटक केलेल्या एका महिलेने कबूल केले की, हद्दपार झाल्यानंतर तिने बेनापोल सीमेमार्गे पुन्हा प्रवेश केला आणि हावडा येथून रेल्वेने थेट मुंबई गाठली.

पोलिसांची चिंता वाढली

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये १००० हून अधिक बांगलादेशींना हद्दपार करण्यात आले, तरीही त्यातील अनेक जण पुन्हा पकडले जात आहेत. पुतुल नोजू शेख या ३५ वर्षीय महिलेला जून २०२५ मध्ये हद्दपार केले होते, मात्र ती पाच महिन्यांतच पुन्हा उल्हासनगरमध्ये येऊन राहू लागली. विक्रोळी आणि धारावीमध्ये जुलै २०२५ मध्ये हद्दपार केलेल्या महिला पुन्हा विक्रोळीच्या झोपडपट्टीत आणि धारावीच्या सायन-वांद्रे लिंक रोडवर वेश्याव्यवसाय करताना आढळल्या. गेटवे ऑफ इंडिया आणि कफ परेड सारख्या उच्चभ्रू भागातही हद्दपार केलेल्या महिला पुन्हा कामाला लागल्याचे समोर आले आहे. (Bangladeshi Infiltration)

सामाजिक आणि सुरक्षा आव्हाने

या घुसखोरांमुळे केवळ लोकसंख्येवर ताण पडत नाही, तर गुन्हेगारीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. वेश्याव्यवसाय, अंमली पदार्थांची विक्री आणि बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या टोळ्यांमध्ये या घुसखोरांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. घाटकोपरमधील एका कारवाईत पकडलेल्या बांगलादेशींनी कबूल केले की, त्यांचे शेकडो नातेवाईक आणि ओळखीचे लोक सध्या मुंबई, पुणे आणि आसपासच्या परिसरात बेकायदेशीरपणे राहत आहेत. वर्सोवा पोलिसांनी तर २१ बांगलादेशींना ताब्यात घेतले, ज्यात १८ तृतीयपंथीयांचा समावेश होता. (Bangladeshi Infiltration)

कठोर पावले उचलण्याची गरज

हद्दपार केलेल्या व्यक्तींचे वारंवार परत येणे हे सीमा व्यवस्थापनातील त्रुटींकडे निर्देश करते. केवळ हद्दपारी पुरेशी नसून, बायोमेट्रिक डेटाचा कडक वापर आणि सीमेवर अधिक कडक पाळत ठेवणे अनिवार्य झाले आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, केंद्रीय यंत्रणांशी समन्वय साधून या संघटित घुसखोरीच्या जाळ्याचा बिमोड करणे आता काळाची गरज आहे. जर हे घुसखोर 'डंकी' मार्गाने वारंवार भारतात येणार असतील, तर आपल्या कायदा अंमलबजावणी यंत्रणांना अधिक मजबूत 'सुरक्षा कवच' निर्माण करावे लागेल. अन्यथा, ही हद्दपारीची आणि पुन्हा येण्याची चक्रीय प्रक्रिया भारताच्या अंतर्गत सुरक्षेला कायमस्वरूपी सुरुंग लावत राहील. (Bangladeshi Infiltration)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post