भारतातील बँकिंग (Indian Bank) आणि पेमेंट क्षेत्राला संभाव्य सायबर हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी केंद्र सरकार सतर्क झाले आहे. 'अँथ्रोपिक' (Anthropic) या कंपनीने विकसित केलेल्या 'मायथोस' (Mythos) नावाच्या अत्यंत शक्तिशाली कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) मॉडेलमुळे जागतिक स्तरावर सायबर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर, केंद्रीय अर्थमंत्रालयाने देशातील प्रमुख बँकांच्या प्रमुखांसोबत एक आपत्कालीन बैठक बोलावली. या बैठकीत बँकांनी खात्री दिली आहे की, ते आपल्या डिजिटल प्रणालीला कोणत्याही बाह्य धोक्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलत आहेत. (Mythos AI)
‘मायथोस एआय’ आणि बँकिंग समोरील आव्हाने‘मायथोस’ हे एआय मॉडेल सॉफ्टवेअरमधील जुन्या आणि लपलेल्या त्रुटी शोधून त्याद्वारे सायबर हल्ला करण्यात मानवापेक्षाही अधिक वेगवान असल्याचे मानले जाते. जरी या कंपनीने हे मॉडेल सार्वजनिकरीत्या उपलब्ध केलेले नाही, तरीही काही अनधिकृत व्यक्तींनी या प्रणालीमध्ये प्रवेश मिळवल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. बँकांचे आयटी (IT) जाळे हे ग्राहक, कंपन्या आणि इतर वित्तीय सेवांशी जोडलेले असते. जर या प्रणालीवर हल्ला झाला, तर देशाची आर्थिक स्थिरता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे बँकांनी आता ‘प्रोजेक्ट ग्लासविंंग’ (Project Glasswing) अंतर्गत या धोक्यांचा अभ्यास सुरू केला आहे.
