Dailyhunt

CM Medical Assistance Fund : सावधान! मुख्यमंत्री फडणवीस आणि सलमान खान यांच्या नावाचा 'तो' संदेश खोटा; अफवांवर विश्वास ठेवू नका

सोशल मीडियावर सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि प्रसिद्ध अभिनेता सलमान खान यांच्या नावाचा वापर करून एक संदेश वेगाने पसरत आहे. या संदेशात मंत्रालयात 'ग्राम वैद्यकीय सहायता निधी' (Gram Vaidyakiya Sahayata Nidhi) नावाचा विभाग सुरू झाल्याचा आणि त्याद्वारे रुग्णांना २५ लाखांपर्यंत मदत मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मात्र, राज्य प्रशासनाने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला असून हा संदेश बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे गरजू रुग्णांची फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (CM Medical Assistance Fund)

अधिकृत मदतीसाठी केवळ एकच विभागमंत्रालयाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, सातव्या मजल्यावर केवळ ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष’ हा एकच विभाग अधिकृतपणे कार्यरत आहे. ‘ग्राम वैद्यकीय सहायता निधी’ किंवा ‘बिंग ह्युमन’ (Being Human) संस्थेशी संबंधित मंत्रालयात कोणताही स्वतंत्र कक्ष नाही. समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या पत्रात उल्लेख असलेले संपर्क क्रमांक किंवा औषधालयांची माहिती अधिकृत सरकारी योजनेचा भाग नाही. नागरिकांनी अशा कोणत्याही अनधिकृत माहितीला बळी पडू नये. CM Medical Assistance Fund

हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहनवैद्यकीय मदतीची गरज असलेल्या रुग्णांनी केवळ अधिकृत माध्यमांचाच वापर करावा, असे आवाहन सरकारने केले आहे. कोणत्याही अफवेवर विश्वास न ठेवता अधिक माहितीसाठी १८००१२३२२११ या टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. संवेदनशील विषयांबाबतचे संदेश खातरजमा केल्याशिवाय पुढे पाठवू नका, जेणेकरून गरजू लोकांची दिशाभूल होणार नाही. केवळ सरकारी चॅनेल्स आणि अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेली माहितीच सत्य मानावी, असे प्रशासनाने ठामपणे सांगितले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post