पेट्रोल आणि डिझेलच्या (CNG PNG Price Hike) वाढत्या किमतींनी हैराण झालेल्या मुंबईकरांना आता पुन्हा एकदा महागाईचा आणखी एक मोठा झटका सहन करावा लागणार आहे. कारण मुंबई आणि महानगरामध्ये सीएनजीच्या दरात पुन्हा 2 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे.
आता सीएनजीचा दर प्रतिकिलो 86 रुपयांवर पोहोचलाय. तर पीएनजीमध्येही 50 पैशांची वाढ करण्यात आली असून हे दर आता प्रति युनिट 52 रुपयांवर पोहचले आहे. या दरवाढीमुळे रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनचालकांचे बजेट कोलमडणार आहेत. सोबतच वाहतूक खर्च वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशालाही मोठी कात्री लागणार आहे. (CNG PNG Price Hike)
दरम्यान, आजपासूनच (30 मे) सीएनजी आणि पीएनजीची दरवाढ लागू होणार आहे. आजपासून (शनिवार) संपूर्ण मुंबई आणि महानगर प्रदेशात (एमएमआर) कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) महाग होणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने (एमजीएल) किरकोळ दरात 2 रुपये प्रति किलोने वाढ केली आहे, तर पाईपद्वारे मिळणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसच्या दरातही 50 पैसे प्रति युनिटने वाढ होणार आहे. या नवीन बदलामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परिसरातील इतर भागांमध्ये सीएनजीचा दर 84 रुपये प्रति किलोवरून 86 रुपये प्रति किलो होणार आहे. याचा परिणाम दैनंदिन प्रवास करणाऱ्यांवर होणार आहे. कारण ऑटोरिक्षा, टॅक्सी आणि बस अजूनही मोठ्या प्रमाणावर या इंधनावर अवलंबून आहेत. पाईपद्वारे मिळणाऱ्या गॅसचा दर 52 रुपये प्रति युनिटपर्यंत वाढणार असून, याचा परिणाम एमएमआर प्रदेशातील 31 लाखांहून अधिक कुटुंबांवर होईल. (CNG PNG Price Hike)
- Bangladeshi Infiltrators : कर्नाटकात २० लाख बांगलादेशी घुसखोर; बहुतेकांकडे बनावट भारतीय कागदपत्रे
एमजीएलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 13 मे रोजी झालेल्या 2 रुपयांच्या दरवाढीनंतर या महिन्यात सीएनजीच्या दरात ही दुसरी दरवाढ आहे. एप्रिलमध्येही सीएनजीच्या दरात ₹1 ने वाढ करण्यात आली होती. एका अधिकाऱ्याने सांगितले, "जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम करणारे भू-राजकीय मुद्दे, महागड्या गॅस स्रोतांवरील वाढते अवलंबित्व, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे गॅस खरेदीचा एकूण खर्च लक्षणीयरीत्या वाढला आहे. यामुळे एमएमआरमध्ये सीएनजीच्या दरात दोन रुपयांची आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या दरात 50 पैशांची वाढ झाली आहे." अधिकाऱ्याने पुढे सांगितले: "किमतीत बदल होऊनही, सीएनजी इतर इंधनांच्या तुलनेत लक्षणीय बचत देत आहे. मुंबईतील सध्याच्या इंधनाच्या किमतींनुसार, सुधारित दरातील सीएनजी पेट्रोलच्या तुलनेत अंदाजे 45% आणि डिझेलच्या तुलनेत 12% बचत देतो." (CNG PNG Price Hike)
