Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Crime : हाय-टेक पद्धतीने फॉर्च्युनर चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; राजकोटमधून दोघांना बेड्या

  • प्रतिनिधी

Crime मुंबईतील टोयोटा शोरूममधून हाय-टेक पद्धतीने फॉर्च्युनर मोटार कार चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या खार पोलिसांनी आवळल्या आहेत. आरोपींनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून गाडीच्या चावीचे सिग्नल क्लोन करत हा प्रताप केला होता.

(Crime)

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुजरातच्या राजकोटपर्यंत पाठलाग करून या दोघांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी ४५ लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर कार, ब्लूटूथ कार स्कॅनर आणि मोबाइल फोन असा ऐवज हस्तगत केला आहे. दिप रमणीकभाई आघेर (२८) आणि राहुलभाई भरतभाई घीयाल (२९, दोघेही रा. राजकोट, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीपैकी दिप आघेर याच्यावर विविध राज्यांत पाचपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत, तर राहुल घीयाल हा सुरतमधील सरथाणा पोलीस ठाण्यात एका गुन्ह्यात हवा आहे. (Crime)

खार (प.) येथील टोयोटा शोरूमची एक फॉर्च्युनर कार २४ जून रोजी रात्री शोरूमबाहेर पार्क केली होती. २५ जून रोजी सकाळी ती कार ग्राहकाच्या टेस्ट ड्राईव्हसाठी नेण्यासाठी कर्मचारी गेले असता, ती चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Crime)

गुन्हा घडल्यानंतर खार पोलीस ठाण्याचे सपोनि. कुंभारे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, आरोपींनी हाय-टेक उपकरणांचा वापर करून गाडीच्या चावीचे सिग्नल क्लोन केल्याचे निष्पन्न झाले. तांत्रिक तपासादरम्यान गाडी दहिसर टोलनाक्यामार्गे गुजरातच्या दिशेने गेल्याचे आणि दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी त्यावर बनावट नंबर प्लेट लावल्याचे समोर आले. मात्र, गाडीच्या विशिष्ट खुणांवरून ती ओळखण्यात आली. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचे लोकेशन राजकोटमध्ये असल्याचे समजताच, पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने सापळा रचून दोघांना अटक केली. (Crime)

चौकशीदरम्यान आरोपींनी चोरीची कार ३०० किलोमीटर दूर असलेल्या नवसारी जिल्ह्यातील चिखली येथे लपवून ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी ट्रान्झिट रिमांड घेत ही कार हस्तगत केली. आरोपींपैकी एक जण तांत्रिक उपकरणांद्वारे गाडीची सुरक्षा यंत्रणा हॅक करण्यात तर दुसरा गाडीचे फीचर्स निष्क्रिय करण्यात आणि चेसिस नंबरमध्ये फेरफार करण्यात माहीर असल्याचे तपासात उघड झाले आहे. सध्या हे दोन्ही आरोपी ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत असून, त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (Crime)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post