प्रतिनिधी
Crime News पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत पोलिसांनी २२ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वाकडपाडा गावात २१ ऑगस्ट रोजी हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Crime News)
मोखाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजित साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम २९९ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात २२ महिलांना आरोपी करण्यात आले असून, उल्हासनगर येथील सत्यवती बाळकृष्ण कुंचे (४६) आणि वाकडपाडा येथील कुसुम शिवराम कांबडी या दोघींची मुख्य संशयित म्हणून ओळख पटली आहे. (Crime News)
या प्रकरणी १८ वर्षीय विद्यार्थ्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, २१ ऑगस्ट रोजी दुपारी महिलांचा एक गट त्याच्या घरी आला होता. त्यावेळी सत्यवती कुंचे हिने त्याला 'नवा करार' अर्थात बायबलसह काही धार्मिक पुस्तके मोफत देऊ केली. ही पुस्तके वाचल्यास आजार बरे होतील आणि विविध रोगांपासून संरक्षण मिळेल, असा दावा केल्याचे तक्रारीत नमूद आहे.(Crime News)
मात्र, संबंधित विद्यार्थ्याने हे साहित्य स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर त्याच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच हिंदू देवता आणि श्रद्धांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्ये करून हिंदू धर्माची पूजा थांबवावी आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारावा, असा सल्ला देण्यात आल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले. या आरोपांच्या आधारे मोखाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून आरोपी महिलांची भूमिका आणि घटनेतील नेमका सहभाग याबाबत चौकशी केली जात आहे. (Crime News)

