प्रतिनिधी
Cyber Fraud मुंबईत बसून दुबईतील सायबर गुन्हेगारांना बळ देणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा गुन्हे शाखेच्या कक्ष-२ ने पर्दाफाश केला आहे. मुंबईतील ‘जे. डी. ओव्हरसीज’ या बोगस कंपनीच्या नावाखाली हे रॅकेट चालवले जात होते.
मुंबई गुन्हे शाखेने टोळी प्रमुखासह सहा जणांना अटक केली असून, मोठ्या प्रमाणावर बँक खाती आणि सिमकार्डचा साठा जप्त केला आहे. मोहम्मद शब्बीर अब्दुल करीम (४२), चिराग मोहनलाल चावडा (२९), भावेश हिर्जी महेश्वरी (२९) रोहन मोहनलाल चावडा (२८), विशाल प्रेमजी मारू (२२), गोविंद वीरजी बुचिया (२९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यातील एक जण महाराष्ट्रातील आणि इतर पाच जण गुजरात राज्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Cyber Fraud)
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने मजीद बंदर येथील पार्श्व चेंबर्समधील रूम नंबर ३०३ वर छापा टाकला. याठिकाणी आरोपींनी ‘जे. डी. ओव्हरसीज’ या नावाने बोगस कंपनी थाटली होती. याद्वारे मुंबईतील विविध बँकांमध्ये करंट अकाऊंट उघडले जात होते. या खात्यांचे डिटेल्स आणि सिमकार्ड दुबईला पाठवून तेथील ऑनलाइन गेमिंग आणि सायबर फसवणुकीसाठी वापरले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. छाप्यादरम्यान पोलिसांनी संशयितांकडून ६६ एटीएम कार्ड, १५ पासबुक, १२२ चेक बुक, दोन लिनोव्हो संगणक, एक कॅनन प्रिंटर, १२ सिमकार्ड, दोन पेनड्राइव्ह आणि विविध कंपन्यांचे ६८ रबरी शिक्के जप्त केले आहेत. यासोबतच बँक खाते उघडण्याचे फॉर्म आणि विविध कंपन्यांची उद्योग नोंदणी प्रमाणपत्रेही सापडली आहेत. (Cyber Fraud)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीना उघडलेल्या बँक खात्याचा वापर १८ सायबर गुन्ह्यात करण्यात आलेला असून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे) राज तिलक रौशन यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. अटक आरोपीपैकी मोहम्मद शब्बीर अब्दुल करीम याचा कपड्याचा व्यवसाय होता,व्यवसायात नुकसान झाल्यामुळे पैसे कमविण्यासाठी तो या टोळीत सामील झाला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणी पायधुणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटकेतील आरोपींना न्यायालयाने ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून गुन्हे शाखेचे अधिकृत पथक आता या टोळीच्या दुबईतील कनेक्शनचा अधिक तपास करत आहे. (Cyber Fraud)
