Dailyhunt

Dadra Nagar Haveli हादरली! नायट्रोजन गॅस गोदामात मोठा स्फोट; ४ जणांचा जागीच मृत्यू

गुजरात राज्यातील दादरा आणि नगर हवेली (Dadra Nagar Haveli) या केंद्रशासित प्रदेशातील सेल्वस येथे शनिवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. देमानी रोडवरील नायट्रोजन गॅसच्या (Nitrogen Gas Blast) गोदामात सिलेंडर भरत असताना मोठा स्फोट झाला.

या भीषण घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आणि पाच जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Dadra Nagar Haveli)

अपघात कसा झाला ?

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी ४ एप्रिलला सकाळी गोदामात कामगार नायट्रोजन वायूचे सिलिंडर भरत होते. अचानक एका सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे गोदामाच्या काही भागाचे नुकसान झाले आणि ढिगाऱ्याचे तुकडे रस्त्यावर उडाले. आजूबाजूच्या परिसरात जोरदार कंपने जाणवल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले.

भूकंपासारखे धक्के जाणवले

स्थानिकांच्या मते, स्फोटाचा आवाज ३० मीटर अंतरापर्यंत ऐकू आला. जवळून जाणारी शाळकरी मुले आणि स्थानिक रहिवासी घाबरले. काही लोकांना तर भूकंपासारखे धक्के जाणवल्याचेही सांगितले.

गोदाम व्यवस्थापकाचाही मृतांमध्ये समावेश

घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि अग्निशमन दलाची अनेक वाहने घटनास्थळी दाखल झाली. मदत आणि बचाव कार्य तात्काळ सुरू करण्यात आले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक अहवालानुसार, मृतांमध्ये गोदामाच्या व्यवस्थापकाचा समावेश होता. तसेच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्राथमिक तपासात सुरक्षा मानकांचे उल्लंघन झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रशासनाने संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश दिले असून, सिलेंडर भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान झालेल्या निष्काळजीपणाच्या व्याप्तीची चौकशी करत आहे, ज्यामुळे हा मोठा अपघात घडला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post