प्रतिनिधी
Dahisar दहिसर पूर्वेकडील केतकीपाडा परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या पथकाला शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण केल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी १० फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एका फेरीवाल्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध सुरू आहे. (Dahisar)
आर-नॉर्थ विभागातील कर्मचारी विनायक काहंडल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मंगळवारी सायंकाळी सुमारे सहा वाजता काहंडल यांच्यासह पाच जणांचे पथक केतकीपाडा येथे अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. पथकाने अनधिकृत हातगाड्या, भाजीपाल्याच्या पेट्या तसेच फळे, भाजीपाला आणि झाडू यांसह अन्य साहित्य महापालिकेच्या वाहनात ठेवण्यास सुरुवात केली. (Dahisar)
यावेळी प्रेमराम चौधरी (४२) याच्यासह आठ ते नऊ फेरीवाल्यांनी महापालिकेच्या वाहनात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यांनी काहंडल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच वाहनात ठेवलेल्या हातगाड्या, भाजीपाल्याच्या पेट्या आणि इतर साहित्य जबरदस्तीने बाहेर काढून नेले. (Dahisar)
घटनेनंतर महापालिका कर्मचाऱ्यांनी दहिसर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी चौधरी याला ताब्यात घेतले, तर त्याच्यासोबत असलेले अन्य फेरीवाले घटनास्थळावरून पसार झाले. त्यांचा शोध सुरू आहे. कर्तव्य बजावत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना अडथळा आणणे, शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी दहिसर पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. (Dahisar)

