Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

'दशावतार' कलेला अखेर अच्छे दिन, कलाकारांना मिळणार दुप्पट अनुदान; सांस्कृतिकमंत्री Ashish Shelar यांची घोषणा

  • प्रतिनिधी

​Ashish Shelar कोकणची अस्मिता असलेल्या आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या ‘दशावतार’ कलेला अखेर अच्छे दिन आले आहेत. दशावतारासह राज्यातील लोककलांच्या अनुदानात थेट दुप्पट वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

आतापर्यंत २ कोटी २२ लाख रुपये असलेले हे अनुदान आता ४ कोटी ४० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आले असून, याचा मोठा फायदा राज्यातील हजारो कलाकारांना होणार आहे. विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ही घोषणा केली. (Ashish Shelar)

​दशावतारी कलाकारांच्या समस्या मांडताना आमदार निलेश राणे यांनी या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधले होते. यावर बोलताना मंत्री ॲड. शेलार यांनी स्पष्ट केले की, या अनुदानाची रक्कम आता थेट कलाकारांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. वाढीव निधीपैकी निम्मी रक्कम ही थेट कलाकारांना, तर उर्वरित रक्कम कलापथक चालकांना दिली जाणार आहे. यामुळे अनुदानाचा लाभ मध्यस्थांच्या हाती न पडता थेट गरजू कलाकारांपर्यंत पोहोचणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील १५ दिवसांत शासन निर्णयाद्वारे केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले. (Ashish Shelar)

​कलाकारांच्या नोंदणीसाठी जिल्हास्तरावर मोहीम राबवून त्यांना अधिकृत ओळखपत्रे देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. याशिवाय, कलाकारांच्या विविध मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी गठित केलेल्या राज्यस्तरीय समितीत अनेक तज्ज्ञ कलावंतांचा समावेश करण्यात आला आहे. केवळ अनुदानच नव्हे, तर दशावतार महोत्सवासह भारूड, शंकासूर आणि शक्तीतुरा या लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यभरात विशेष महोत्सवांचे आयोजन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. (Ashish Shelar)

​दरम्यान, ‘देव खेळ’ या वेब सिरीजमध्ये लोकपरंपरेचा विपर्यास केल्याच्या तक्रारींची दखल घेत, मंत्री ॲड. शेलार यांनी यावर कडक पोलीस कारवाईचे निर्देश दिले आहेत. "लोककलांचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे, त्यामुळे धार्मिक आणि पारंपरिक वारशाशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही," असा सज्जड इशाराही त्यांनी दिला. राजर्षी शाहू महाराज वृद्ध कलाकार मानधन योजनेत दशावतारी कलाकारांचा समावेश करण्याच्या आश्वासनामुळे लोककला क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. आता या निर्णयामुळे कोकणसह राज्यातील लोककलांना नवीन संजीवनी मिळणार आहे. (Ashish Shelar)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post