Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

धक्कादायक! कल्याणमध्ये सीलबंद Ice cream मधून किड्यांची विक्री?

  • कल्याण : प्रतिनिधी

बाळा, सीलबंद आहे…बिनधास्त खा…हा विश्वास कल्याण (Kalyan) पूर्वेकडील कोळसेवाडीच्या रचना पार्कमध्ये (Rachana Park) मातीमोल झाला. एका चिमुकल्याच्या हातात आलेल्या कोन आईस्क्रीममधून (Ice cream) तब्बल तीन इंच लांब, किळसवाणा किडा बाहेर पडला आणि बघणाऱ्यांच्या अंगावर सर्रकन काटा आला.

२०२७ पर्यंत मुदत असलेल्या नामांकित कंपनीच्या आईस्क्रीममध्ये मृत्यूचा हा दूत पोहोचलाच कसा ? हा प्रश्न आता फक्त पालकांचा नाही, तर संपूर्ण व्यवस्थेच्या अब्रूचा झाला आहे.

थोडक्यात वाचला जीव, नाहीतर…

त्या अभागी मुलाने आईसक्रीमचा (Ice cream) पहिला घास तोंडात घातला आणि त्याच क्षणी कोनात काहीतरी हालचाल जाणवली. बाहेर काढून पाहतो तर काय - तीन इंच लांब, जाडजूड, काळाकुट्ट किडा आइस्क्रीमला चिकटून होता. एक सेकंदाचा उशीर झाला असता तर तो सरळ पोटात गेला असता. उलटी, जंतुसंसर्ग, दवाखाना आणि कदाचित विचारही करवत नाही. संतापलेल्या बापाने थेट दुकानदाराची कॉलर पकडली आणि रचना पार्कचा परिसर काही वेळातच रणांगण झाला.

दुकानदार रडकुंडीला आणि वितरक पसार

मी काय करू साहेब…माल सीलबंद आल्याची रड दुकानदाराने गायली. घाबरून त्याने कंपनीच्या वितरकाला बोलावले. पण तो महाशय आला, परिस्थिती पाहिली आणि आमचा संबंध नाही, असे तोंडघशी पाडून तिथून पळ काढता झाला. म्हणजे विष पेरायचे कंपनीने, विकायचे दुकानदाराने आणि मरायचे मात्र आमच्या मुलांनी ? या बेजबाबदारीला सीमा आहे की नाही ? असा सवाल पालकांनी उपस्थित केला.

एफडीएचे अधिकारी झोपलेत का ?

सीलबंद पाकिटात किडा सापडणे हा अपघात नाही, हा खून करण्याचा परवाना आहे. एकतर कारखान्यात कामगार दारू पिऊन कोन भरत होते, नाहीतर उंदीर-घुशींच्या उकिरड्यावर आईस्क्रीम (Ice cream) बनत होते. गुणवत्ता नियंत्रण नावाचा प्रकार फक्त कागदावरच आहे का ? एफडीएचे धाडसत्र, नमुने, परवाने…हे सगळे फक्त हप्तेखोरीसाठी आहेत का ? आज एक किडा सापडला, उद्या डासांची अंडी सापडतील. एफडीएच्या (FDA) अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मुलांना असे आईस्क्रीम भरवावे, मग कळेल पालकांची तडफड काय असते.

हा निष्काळजीपणा नाही, हा सरळ सरळ गुन्हा आहे. पिडीत कुटुंबाने आता एल्गार पुकारला आहे. पंचनामा नको, थेट ३०८, २७३ कलमांखाली गुन्हा दाखल करा. कंपनीचा परवाना रद्द करा. मालकाला बेड्या ठोका, अशी त्यांची ठाम मागणी आहे. आज आमचं पोर नशिबाने वाचलं. पण पैसे कमावण्यासाठी लहान मुलांच्या ताटात किडे वाढणाऱ्या या नराधमांना फासावर लटकवले पाहिजे, असे म्हणत आईचा आक्रोश फुटला.

ग्राहकहो जागे व्हा अन् तक्रार करा…

सीलबंद म्हणजे सुरक्षित हा भ्रम डोक्यातून काढून टाका. मुलांना काहीही विकत घेऊन देऊ नका. पाकीट उघडल्यावर आधी स्वतः तपासा. संशय आल्यास सरळ कचऱ्यात फेका. आणि पुरावा ठेवून एफडीएला १८००२२२३६५ वर फोन लावा. आज तुम्ही गप्प बसलात तर उद्या तुमचं मूल बळी जाईल, असा इशारा जागरूक नेतकऱ्यांनी दिला आहे.

हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post