Disha Salian Case Update: बहुचर्चित दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या तपासाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिला आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
तसेच भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून सीबीआय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
दिशा सालियन यांच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासातील काही त्रुटी आणि विसंगतींवर प्रश्न उपस्थित केले. याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. निकाल जाहीर करताना सीबीआयच्या तपासाबाबत न्यायालयाने काही स्पष्ट सूचना दिल्या.
'सुरुवातीपासून कोणालाही आरोपी मानू नका'
तपासाच्या सुरुवातीपासून कोणत्याही व्यक्तीला थेट आरोपी म्हणून पाहू नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले. सर्व संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवून निष्पक्ष आणि सखोल तपास करावा. तपास पूर्ण झाल्यानंतर उपलब्ध पुरावे आणि निष्कर्षांच्या आधारेच पुढील कायदेशीर कारवाई करून आरोपपत्र दाखल करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. या आदेशानंतर दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी न्यायालयाचे आभार मानले.
पोलिसांच्या तपासातील विसंगतींवर न्यायालयाचे प्रश्न
सुनावणीदरम्यान न्यायालयाने पोलिसांच्या तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. दिशा सालियन या इमारतीच्या १२व्या मजल्यावरून पडल्याचे तपासात नमूद करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावरील इतर नाजूक हाडांना मोठी दुखापत नसताना केवळ दातांना फ्रॅक्चर कसे झाले, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. सरकारी पक्षाने त्या तोंडावर पडल्या असाव्यात, असा युक्तिवाद केला होता. त्यावर तोंडावर पडल्यास चेहऱ्याच्या इतर भागांवर गंभीर दुखापती का आढळल्या नाहीत, अशी विचारणा न्यायालयाने केली.
कपड्यांवरील रक्ताच्या डागांबाबतही प्रश्न
उंचावरून पडल्यामुळे गंभीर दुखापती झाल्याचे सांगितले जात असताना त्यांच्या कपड्यांवर अपेक्षित रक्ताचे डाग का आढळले नाहीत, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले. राज्य सरकारने याचिकाकर्त्यांनी घटनेनंतर सुमारे पाच वर्षांनी हत्येचा संशय व्यक्त केल्याचा मुद्दा मांडला. मात्र, या कालावधीत पोलिसांनी काय कारवाई केली आणि कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास का पूर्ण करण्यात आला नाही, असा सवाल न्यायालयाने केला. पालकांनी आपल्या एकुलत्या एक मुलीच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरण्यासाठी वेळ घेतला असण्याची शक्यताही न्यायालयाने व्यक्त केली.
कलम १७४ अंतर्गत चौकशीवर आक्षेप
कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असताना पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याऐवजी आकस्मिक मृत्यू अहवालाच्या (ADR) आधारे कलम १७४ अंतर्गत चौकशी का केली, असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. तसेच, घटनेला अनेक वर्षे उलटूनही शवविच्छेदन अहवाल कुटुंबीयांना का देण्यात आला नाही, याबाबतही न्यायालयाने प्रश्न विचारले. घटनास्थळाचे थेट सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसणे, बंद दरवाजाबाबत साक्षीदारांच्या जबाबांमध्ये तफावत असणे आणि शवविच्छेदनाच्या प्रक्रियेत नियमांचे पालन झाले होते का, यासारख्या मुद्द्यांवरही न्यायालयाने निरीक्षणे नोंदवली.
राज्य सरकारने काय युक्तिवाद केला?
राज्य सरकारच्या वतीने याचिका फेटाळण्याची मागणी करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासात कोणताही घातपात आढळला नसून दिशा सालियन यांनी आत्महत्या केल्याचा निष्कर्ष तपासात काढण्यात आला असल्याचे सरकारने न्यायालयाला सांगितले. शवविच्छेदन करणारे डॉक्टर आणि फॉरेन्सिक अहवालाचा हवाला देत दिशावर लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार झाल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचेही सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. दिशासोबत राहणारे रोहन राय यांच्या जबाबाचा संदर्भ देत, दिशा तणावाखाली होती आणि तिने आत्महत्या केल्याचे सरकारने सांगितले. तसेच घटनेनंतर अनेक वर्षांनी या प्रकरणाचे राजकीय भांडवल केले जाऊ नये, असा युक्तिवादही करण्यात आला. याला प्रत्युत्तर देताना याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. निलेश ओझा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा दाखला दिला. हत्येचा संशय व्यक्त केला जात असताना केवळ आकस्मिक मृत्यूची चौकशी करणे पुरेसे नसल्याचे सांगत त्यांनी स्वतंत्र आणि सखोल तपासाची मागणी केली.
नेमकं काय आहे दिशा सालियन मृत्यू प्रकरण?
दिशा सालियन या सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून कार्यरत होत्या. ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीवरून पडून त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर अवघ्या सहा दिवसांनी, १४ जून २०२० रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यू झाला. दोन्ही घटनांमध्ये काही संबंध असल्याचे दावे आणि आरोप त्यानंतर करण्यात आले. या प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातही मोठा वाद निर्माण झाला होता. महाराष्ट्र विधिमंडळातही या मुद्द्यावर चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे जाणार आहे. सीबीआयच्या तपासातून या प्रकरणातील संशयास्पद बाबी आणि अनुत्तरित प्रश्नांवर अधिक स्पष्टता येते का, याकडे लक्ष लागले आहे.
हेही पाहा –
https://youtu.be/zlUJOAY-tvQ

