Dailyhunt

डोंबिवलीत 'Digital Arrest'चा थरार! तोतया CBI अधिकाऱ्यांनी नोकरदाराला लुटले; ७१ लाखांचा गंडा

  • कल्याण, प्रतिनिधी

Digital Arrest केंद्रीय तपास यंत्रणेचे अर्थात सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून दोघा बदमाशांनी डोंबिवलीकराची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

तोतया सीबीआय अधिकाऱ्यांनी नोकरदार डोंबिवलीकराला तब्बल ७१ लाख १० हजार रूपयांचा गंडा घातला आहे. फसगत झालेल्या तक्रारदाराच्या पत्नीने हा प्रकार उघडकीस आणला असून या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (Digital Arrest)

महेश आगरकर (रा. पांडुरंगवाडी, मानपाडा रोड, डोंबिवली-पूर्व) असे या कांडात फसगत झालेल्या नोकरदार तक्रारदाराचे नाव आहे. तक्रारदार महेश आगरकर हे डोंबिवली एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात आगरकर यांना अज्ञात व्यक्तीचा फोन आला. सुरूवातीला त्याने स्वतःला ट्राय अर्थात टेलिकॉम रेग्युलेटरी ॲथॉरिटीचा अधिकारी असल्याचे सांगितले. तुमच्या मोबाईलवरून काही महिलांना त्रासदायक आक्षेपार्ह मेसेज पाठविण्यात आल्याचे सांगून सदर व्यक्तीने यासंदर्भात महिलांनी दिलेल्या तक्रारींवरून मुंबईतील घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून हा गुन्हा सीबीआयकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे सांगितले. (Digital Arrest)

त्यानंतर काही दिवसांनी संदीप कुमार राव आणि करण शर्मा अशी नावे सांगणाऱ्या व्यक्तींनी स्वतःला सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून आगरकर यांच्यावर दबाव आणला. तुमच्या बँक व्यवहारात गैरप्रकार आढळल्याचे सांगत या प्रकरणातून सुटका करवून घेण्यासह अटक टाळण्यासाठी रक्कम भरण्याची महेश आगरकर यांना भीती दाखविण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या कथित आदेशांचे दाखले देत त्यांना टप्प्याटप्प्याने रक्कम भरण्यास भाग पाडण्यात आले. आगरकर यांनी त्या दोन्ही व्यक्तींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांवर ऑनलाईन पद्धतीने एकूण ७१ लाख १० हजार रूपये जमा केले. विशेष म्हणजे जमा केलेली रक्कम नंतर परत मिळेल, असेही त्या बदमाशांकडून आगरकर यांना सांगण्यात आले. (Digital Arrest)

पत्नीच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड

याच दरम्यान संशय आल्याने आगरकर यांनी त्यांच्या बाबतीत घडलेला सारा प्रकार पत्नीला सांगितला. पत्नीने प्रश्नांची सरबत्ती केल्याने दोघेही निरूत्तर झाले. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर हा प्रकार बनावट असल्याचे उघडकीस आले. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर महेश आगरकर यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन कागदोपत्री पुराव्यांसह तक्रार दाखल केली. पोलिसांनी संबंधितांविरूद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलमांखाली फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (Digital Arrest)

डिजिटल ॲरेस्टची धमकी

स्वतःला सीबीआयचे अधिकारी/इथिकल हॅकर असल्याचे भासवून महेश आगरकर यांच्याशी फोन आणि व्हॉट्सॲप कॉलद्वारे संपर्क साधला. तुमच्या नावावर/बँक खात्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग/हवाला/अश्लील व्हिडिओ केसमध्ये गुन्हा दाखल आहे. अटक टाळायची असेल तर व्हेरिफिकेशनसाठी पैसे ट्रान्सफर करा, बँक डिटेल्स द्या. या धमकीसह तथाकथित डिजिटल ॲरेस्टच्या भीतीपोटी आगरकर यांची आर्थिक फसवणूक झाली आहे. आगरकर यांनी टिळकनगर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी फसवणूक व तोतयागिरी (Impersonation) कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सायबर सेलच्या मदतीने सुरू आहे. कॉल करणाऱ्यांचे मोबाईल नंबर, बँक खाती, व्हॉट्स ॲप, आयपी, इत्यादी ट्रेस केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अशा प्रकारच्या फोन कॉल्सपासून सावध रहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (Digital Arrest)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post