कल्याण, प्रतिनिधी
Dombivli Crime सुशिक्षितांच्या सांस्कृतिक नगरीत महिला, तरूणींसह चिमुरड्याही असुरक्षित असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. डोंबिवलीतील टिळकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत लागोपाठ दोन धक्कादायक प्रकार घडले आहेत.
एका घटनेत २२ वर्षीय तरूणीवर ३ रिक्षा चालकांनी मिळून सामूहिक अत्याचार केला, तर दुसरीकडे एका ५ वर्षीय चिमुरडीचे पुजाऱ्याकडून लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी तपास चक्रांचा वेग वाढवून या दोन्ही प्रकरणांतील चारही नराधमांना मुसक्या आवळून गजाआड केले आहे. पहिल्या घटनेत २२ वर्षीय तरूणीवर अत्याचार करणाऱ्या चेतन चव्हाण, हेमंत चव्हाण आणि उमेश वर्मा या तिघा रिक्षावाल्यांना अटक करण्यात आली आहे. तर तर दुसऱ्या घटनेत ५ वर्षीय चिमुरडीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली हरीश सुनाय भावे (४६) या पुजाऱ्याला देखिल अटक करण्यात आली आहे. (Dombivli Crime)
पार्टीला गेली… अन् विश्वासघात झाला
कल्याणच्या काटेमानीवली परिसरात राहणारी २२ वर्षीय पिडीत तरूणी सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करते. मूळची सोलापूरची रहिवासी असलेली ही तरूणी डोंबिवलीतील एका सुरक्षा रक्षक एजन्सीमध्ये नोकरीला आहे. तिची ओळख डोंबिवलीतील काही रिक्षाचालकांशी होती. याच ओळखीचा फायदा घेत तिघा रिक्षावाल्यांनी पार्टीच्या बहाण्याने ९० फुटी रोडला असलेल्या खंबाळपाड्यातील एका फ्लॅटवर बोलावले. पार्टीच्या बहाण्याने आपल्याशी दुष्कृत्य होईल, असे तिला वाटले नव्हते. पार्टी संपल्यानंतर या तिघांनी मध्यरात्री १२.४० पासून पहाटे ३.३० पर्यंत या तरूणीवर आळीपाळीने अत्याचार केला. अत्याचारादरम्यान या तरूणीला शिवीगाळ, धाकधमक्या आणि मारझोड देखिल करण्यात आली. पहाटे नराधमांच्या तावडीतून कशीबशी सुटका करवून पिडीत तरूणीने टिळकनगर पोलिस ठाणे गाठले. आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी कथन केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कदम यांनी तातडीने पथके रवाना करून अवघ्या काही तासांतच तिन्ही आरोपींना शोधून त्यांच्या मुसक्या आवळल्या. (Dombivli Crime)
पोलिसांना चेतन चव्हाण, हेमंत चव्हाण आणि उमेश वर्मा या तिघा रिक्षावाल्यांना अटक केली आहे. हे तिघेही डोंबिवली परिसरात रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. पोलिसांनी त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. डोंबिवलीत रिक्षावाल्यांकडून अशा प्रकारचे दुष्कृत्य घडल्याने महिला प्रवाशांमध्ये अस्वस्थ्यता निर्माण झाली आहे. सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत घृणास्पद घटना समोर आली आहे. एका पाच वर्षांच्या चिमुरडीचे नराधम पुजाऱ्याने लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत टिळकनगर पोलिसांनी हरीश भावे या पुजाऱ्याला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. (Dombivli Crime)
काय आहे प्रकरण?
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, गोग्रासवाडी परिसरात घरोघरी जाऊन पूजा-अर्चा करणाऱ्या हरीश भावे या पुजाऱ्याने हे निंदनीय कृत्य केले आहे. पिडीत चिमुरडीचे आई-वडील दोघेही मोलमजुरीच्या कामानिमित्त घराबाहेर असतात. याचा गैरफायदा आरोपीने घेतला. आरोपी हरीश भावे हा पिडीत कुटुंबाच्या घराशेजारीच राहतो. त्यामुळे त्याचे पिडीतांच्या घरी येणे-जाणे होते. या ओळखीचा फायदा घेत त्याने या चिमुरडीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पिडीत चिमुरडीच्या बाबतीत १५ मार्चपासून १ एप्रिलपर्यंत हा सारा प्रकार सुरू होता. पिडीत चिमुरडीने तिच्यासोबत घडलेला हा सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. आपल्या पोटच्या गोळ्यासोबत घडलेला हा प्रकार ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. वेळ न दवडता मुलीला सोबत घेऊन पालकांनी पोलिस ठाणे गाठले आणि मुलीसोबत घडलेला सारा प्रकार सांगितला. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७६ सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८, १२ अन्वये गुन्हा नोंदवून आरोपी हरीश भावे याला बेड्या ठोकल्या. (Dombivli Crime)
वाढत्या गुन्हेगारीमुळे डोंबिवलीकरांत चिंता
तीन रिक्षाचालकांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना ताजी असतानाच, पाच वर्षांच्या चिमुरडीसोबत घडलेल्या या घटनेमुळे डोंबिवलीत नक्की चाललंय काय? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. एका पुजाऱ्यानेच अशा प्रकारचे नीच कृत्य केल्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एकीकडे पोलिस या प्रकरणाचा चौकस तपास करत आहेत, तर दुसरीकडे या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. (Dombivli Crime)
