Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Dombivli Doctor Assault Case : शास्त्रीनगर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी

Dombivli Doctor Assault Case : शास्त्रीनगर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी

  • कल्याण : प्रतिनिधी

Dombivli Doctor Assault Case : शिंदे गटाचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे (Ramesh Mhatre) यांनी केलेल्या हिंसाचार प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) गंभीर दखल घेतल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला आहे.

या गुन्ह्यातील सर्व बारकावे शोधून काढण्यासाठी तपास यंत्रणा काम करत असतानाच, शास्त्रीनगर रूग्णालयातील (Shastrinagar hospital) घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजची न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून तांत्रिक तपासणी करण्यात आली आहे. (Dombivli Doctor Assault Case)

सोमवारी ६ जुलैच्या रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका गर्भवती महिलेच्या उपचारावरून झालेल्या वादातून शास्त्रीनगर रूग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांचे खासगी अंगरक्षक असलेले रमेश पवार, प्रकाश निकम आणि अक्षय कारंडे अशा चौघांनी रूग्णालयाच्या ज्या दालनात परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांना मारहाण केली, त्या दालनातील सीसीटीव्ही फुटेजमधील चलतचित्रांसह डॉक्टर, कर्मचारी आणि परिचारिकांच्या आवाजाची तपासणी बुधवारी करण्यात आली. यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे तांत्रिक पथक कल्याणमध्ये (Kalyan) दाखल झाले होते. कल्याणच्या सहाय्यक पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त कार्यालयात बुधवारी सकाळी ११ ते रात्री ८ वाजेपर्यंत हे पथक तळ ठोकून होते. या काळात फुटेजमधील आवाज स्पष्ट करणे, बोलणाऱ्या व्यक्तींचे ध्वनी निश्चितीकरण करणे आणि घटनेच्या वेळेची अचूक नोंद करणे यांसारखी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. रमेश म्हात्रे आणि त्यांचे सहकारी केडीएमसीच्या (KDMC) डोंबिवलीतील शास्त्रीनगर रूग्णालयात दाखल झाल्यापासून ते डॉक्टरांवर हल्ला करण्यापर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. न्यायालयीन प्रक्रियेत फुटेजमधील पुरावे महत्त्वाचे ठरणार असल्याने त्यांची बारकाईने तपासणी करण्यात येत आहे. (Dombivli Doctor Assault Case)

न्यायवैद्यक अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांनुसार या प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि जलद गतीने पूर्ण केला जाणार आहे. या घटनेनंतर आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रूग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाण प्रकरणानंतर समस्त वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांसह संस्था/संघटनांनी याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. (Dombivli Doctor Assault Case)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post