कल्याण : प्रतिनिधी
Dombivli : पश्चिमेकडे जुनी डोंबिवली परिसरात आईस्क्रीम (Ice cream) ठेवण्याच्या फ्रीजचा विजेचा धक्का लागून ३२ वर्षीय आईस्क्रीम विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
जगदीश लाल गाडरी असे मृत विक्रेत्याचे नाव असून ते जुनी डोंबिवलीतील वैभव मंगल कार्यालयाजवळील ताराबाई चाळीत कुटुंबीयांसह राहत होते. गेल्या अनेक वर्षांपासून जुनी डोंबिवली (Dombivli) परिसरात आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करत होते.
बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते दुकानात ग्राहकांना आईस्क्रीम देत असताना फ्रीज उघडून आईस्क्रीम काढत होते. त्याचवेळी फ्रीजमध्ये विजेचा जिवंत प्रवाह आल्याने त्यांना जोरदार धक्का बसला आणि ते जागीच कोसळले. आवाज ऐकून आसपासच्या व्यापाऱ्यांसह ग्राहकांनी धाव घेऊन त्यांना तातडीने केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात (Shastrinagar Hospital) नेले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी गणेश कुमावत यांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्यात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत मोरे अधिक तपास करत आहेत.

