कल्याण, प्रतिनिधी
Dombivli पावसाळ्यापूर्वीच्या सर्व दाव्यांची हवा निघाली आहे. डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील मिलापनगरमध्ये एका मोठ्या लोकप्रतिनिधीच्या बंगल्यासह वंदे मातरम् उद्यानाजवळील नाला गेल्या २ दिवसांपासून तुडुंब भरून वाहत आहे.
पाडलेल्या भगदाडातून नाल्यातील सांडपाणी थेट रहिवासी क्षेत्रात येत असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून रोगराई पसरण्याची भितीही व्यस्त करण्यात येत आहे. (Dombivli)
सांडपाणी घरात घुसून रोगराई पसरण्याची भिती
मिलापनगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनचे सचिव अरूण जोशी यांनी सांगितले की, जर पावसाचा जोर आणखी वाढला तर मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही नाल्याचे पाणी बंगल्यांच्या आवारात आणि घरांमध्ये घुसणार आहे. परिणामी या परिसरात रोगराई पसरण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे एमआयडीसी आणि केडीएमसी प्रशासनाने वेळीच योग्य ती पावले उचलावीत, असे जोशी म्हणाले. (Dombivli)
एमआयडीसीचा कारभार उलटा पडला
काही दिवसांपूर्वी या मोठ्या नाल्याला एमआयडीसीकडून २ ठिकाणी भगदाड पाडून पाईप बसविण्यात आले होते. याला स्थानिक रहिवाशांनी तेव्हाच विरोध केला होता. मिलापनगर रेसिडेंट्स वेल्फेअर असोसिएशनचे सचिव अरूण जोशी आणि या भागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी एमआयडीसीच्या अभियंत्यांना हे चुकीचे असल्याचे समजावून सांगितले होते. यावर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी धक्कादायक स्पष्टीकरण दिले होते. रस्त्यावरील पावसाचे साचणारे पाणी पाईपद्वारे नाल्यात जाईल. मात्र आता नेमके उलटे झाले आहे. नाल्यातील सांडपाणी याच पाईपमधून रस्त्यावर आणि रहिवाशांच्या आवारात येत असल्याचे राजू नलावडे यांनी सांगितले. (Dombivli)
साफसफाईचा उडाला बोजवारा
यातच केडीएमसीकडून या भागातील नाल्यांची साफसफाई करण्यात आली नाही. आजही नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक आणि गाळ साचला आहे. त्यामुळे पाण्याला निचरा होण्याचा मार्गच राहिलेला नाही. त्यामुळे साफसफाईचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे दिसून येत आहे. (Dombivli)
कुणालाही काही पडलेले नाही
एकंदर कुणालाही प्रशासनाला ना लोकप्रतिनिधींना याची चिंता असल्याचे दिसत नाही. जर यापुढे जोराच्या मुसळधार पावसात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर याला जबाबदार केडीएमसी, एमआयडीसी आणि सर्व लोकप्रतिनिधी असतील, असा इशारा त्रस्त रहिवाशांनी दिला आहे. प्रशासन आणि सर्व लोकप्रतिनिधींनी यावर तातडीने लक्ष घालावे अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. अन्यथा याचा जाब रस्त्यावर उतरून विचारण्यात येईल असाही इशारा रहिवाशांनी दिला आहे. (Dombivli)
