कल्याण, प्रतिनिधी
Dombivli विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने रिक्षा चोरीच्या गुन्ह्यात एका सराईत वाहन चोराला अटक करून त्याच्याकडून २ रिक्षा आणि २ स्कूटी असा एकूण २ लाख ७० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आदर्श रोहिदास बागडे (२५, रा. कुंभारखानपाडा, डोंबिवली-पश्चिम) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून कल्याण न्यायालयाने त्याला अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (Dombivli)
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विष्णूनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या रिक्षा चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आदर्श बागडे या २५ वर्षीय तरूणाला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याच्याकडून सदर गुन्ह्यात चोरी झालेली रिक्षा हस्तगत करण्यात आली. (Dombivli)
पुढील तपासात कसून चौकशी केली असता त्याने अंबरनाथ पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात चोरी गेलेली स्कूटी आणि सेंट्रल पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात चोरीस गेलेली रिक्षा देखील चोरल्याचे कबूल केले. त्याच्याकडून ही दोन्ही वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. अशाप्रकारे विष्णूनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने २ रिक्षा आणि २ स्कूटी असा एकूण २ लाख ७९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपीवर यापूर्वी विष्णूनगर, नौपाडा आणि कोपरी पोलिस ठाण्यात ३ गुन्हे दाखल आहेत. (Dombivli)
