कल्याण : प्रतिनिधी
जागतिक अंमली पदार्थ (Drugs) विरोधी दिनानिमित्त गुरूवारी कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात 'सुसंगती सदा घडो' या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कल्याण परिमंडळ-३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे (Atul Zende) यांनी अंमली पदार्थांच्या वाढत्या धोक्यावर भाष्य करताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पोलिस उपायुक्त अतुल झेंडे (Atul Zende) म्हणाले, आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे. या निमित्ताने ठाणे पोलिस आयुक्तालय, कल्याण परिमंडळ-३ आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) यांच्या संयुक्त विद्यमाने हा जनजागृती कार्यक्रम आयोजित केला आहे. कल्याण-डोंबिवली परिमंडळातील सर्व महाविद्यालयांचे वरिष्ठ शिक्षक आणि विद्यार्थ्यांना एकत्रित करून हा कार्यक्रम घेण्यात आला आहे.
दुष्परिणामांसह उपायांवर मार्गदर्शन
अंमली पदार्थांचे (Drugs) दुष्परिणाम काय आहेत आणि त्यापासून दूर राहण्यासाठी काय करता येईल याबाबत मार्गदर्शन करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. अंमली पदार्थांच्या विळख्यातून युवकांना वाचविण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिघांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. या संदर्भात जनजागृती करण्यासाठीच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे डीसीपी अतुल झेंडे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना डॉ. दीपा शुक्ल यांचे आवाहन
सुसंगती सदा घडो’ या कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन करताना केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल म्हणाल्या, मित्रांच्या दबावाखाली येऊन चुकीच्या गोष्टींना बळी पडू नका. त्यांना 'नाही' म्हणायला शिका. तुमचे शरीर आणि मन हीच तुमची खरी संपत्ती आहे. व्यसनामुळे ती नष्ट होते. जर कधी एकटे वाटले, मन अस्वस्थ झाले, झोपेचे चक्र बिघडले किंवा चुकीच्या सवयी लागल्याची शंका आली, तर लगेच विश्वासातील व्यक्तीशी बोला. शाळेतील समुपदेशक, शिक्षक किंवा हेल्पलाईनची मदत घ्या. व्यसन ही मानसिक आणि शारीरिक गुंतागुंत आहे. आजारासारखी ती देखील बरी होऊ शकते. कुटुंब, मित्र आणि डॉक्टरांची साथ असेल तर नव्याने सुरुवात करणे शक्य आहे.

पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली मोहीम
जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे (Ashutosh Dumbare) यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त संजय जाधव, परिमंडळ – ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक होनमाने, डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे, केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल, यांच्यासह कल्याण-डोंबिवलीतील आठही पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक व इतर मान्यवरांनी उपस्थित राहून अंमली पदार्थ जनजागृतीपर मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. आजच्या कार्यक्रमातून आम्हाला अंमली पदार्थांचे खरे दुष्परिणाम समजले. मित्रांच्या दबावाला बळी न पडता 'नाही' म्हणण्याची हिंमत मिळाली. आम्ही आमच्या इतर मित्रांनाही याबाबत जागरूक करू, असे अनेक विद्यार्थ्यांनी सांगून पोलिस विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमाला कल्याण परिमंडळ ३ मधील ज्युनिअर व सिनियर कॉलेजच्या काही शिक्षकांसह जवळपास ७०० ते ८०० विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
