Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दुष्काळाविरुद्ध लोकचळवळ उभारा; CM Devendra Fadnavis यांचे आवाहन

दुष्काळाविरुद्ध लोकचळवळ उभारा; CM Devendra Fadnavis यांचे आवाहन

  • मुंबई प्रतिनिधी

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करून गावे जलसमृद्ध करण्यासाठी शासन, प्रशासन आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या जलसमृद्धीसाठी 'सत्यमेव जयते वॉटर कप' अभियानाला बळ देऊन दुष्काळाविरुद्धची लढाई लोकचळवळ म्हणून उभी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी शनिवारी येथे केले.

आपल्या सर्वांचा एकच पक्ष तो म्हणजे 'दुष्काळ विरोधी पक्ष' असून यासाठी एकजुटीने काम केले पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

पाणी फाउंडेशन (Paani Foundation) आयोजित 'सत्यमेव जयते वॉटर कप ' स्पर्धेचा शुभारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘वर्षा ‘निवासस्थानी करण्यात आला. यावेळी जलसंधारण मंत्री संजय राठोड, अभिनेता आमिर खान, मुख्यमंत्र्यांचे जलविषयक सल्लागार श्रीराम वेदिरे, पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ आदी उपस्थित होते.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ‘ कन्व्हर्जन्स, कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन' या तीन बाबींवर विशेष भर द्यावा. योजनांचे एकत्रीकरण, त्याबाबतची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचविणे आणि सर्व विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी नियोजित जलसंधारणाची सर्व कामे पूर्ण करावीत. प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मंजुरीच्या प्रक्रियेत विलंब होऊ नये. प्रत्येक दिवस महत्त्वाचा असून प्रशासनाने ग्रामस्थांच्या आधी तयारीत राहून कामांना गती द्यावी, असे निर्देश फडणवीस यांनी यावेळी दिले.

गावांमध्ये वॉटरशेड आणि सूक्ष्म जलसिंचनाचे शास्त्रीय नियोजन करून सर्व आवश्यक उपचार पूर्ण करणे गरजेचे आहे. यापूर्वी राबविण्यात आलेल्या 'गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार' उपक्रमामुळे जलस्रोतांची क्षमता वाढण्यास आणि शेतीची सुपीकता सुधारण्यास मदत झाली आहे. त्याच धर्तीवर यंदाच्या उपक्रमातही सर्व उपलब्ध योजनांचा समन्वय साधावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शास्त्रीय पद्धतीने जलस्रोतांचे पुनरुज्जीवन

यंदा एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई (Water shortage) निर्माण झाली असून अनेक गावांमधील जलस्रोत आटले आहेत. ही परिस्थिती आव्हानात्मक असली, तरी जलसंधारणाच्या कामांना गती देण्याची संधीही आहे. जलस्रोतांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून जलसंधारणाच्या माध्यमातून ते पुन्हा जलपरिपूर्ण करणे, भूजल पातळी योग्य राखणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘होल ऑफ गव्हर्नमेंट’ म्हणून काम करा

वॉटर कप स्पर्धेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाच्या सर्व विभागांनी 'होल ऑफ गव्हर्नमेंट' दृष्टिकोनातून एकत्रित काम करावे. जलसंधारणाची ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मृद आणि जलसंधारण, कृषी, ग्रामविकास आणि पंचायतराज, उमेद अभियान, जलसंपदा, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, व्हीबीजीरामजी, रोजगार हमी योजना, वन विभाग आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अशा सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले.

नगरपंचायत आणि नगरपरिषदांचाही समावेश करणार

वॉटर कप अभियानात नगरपंचायती आणि लहान नगरपरिषदांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी नगरविकास विभागाशी चर्चा करून त्यांच्या समावेशाबाबत स्वतंत्र निकष निश्चित करण्यात येतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post