Dailyhunt

'एसी'च्या नादात सामान्यांचा खोळंबा! Panvel Railway स्थानकात लोकलचं वेळापत्रक कोलमडलं; प्रवाशांचा रेल्वे प्रशासनावर संताप

ध्य रेल्वेच्या हार्बर (Harbour Line) मार्गावर प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या वातानुकूलित लोकल (AC Local Issue) फेऱ्या आता प्रवाशांच्या त्रासाचे कारण ठरत आहेत.

प्रजासत्ताक दिनापासून सुरू झालेल्या १४ नवीन वातानुकूलित फेऱ्यांमुळे सामान्य लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर विपरीत परिणाम झाला आहे. नवीन गाड्यांची संख्या न वाढवता जुन्याच फेऱ्यांचे रूपांतर वातानुकूलित गाड्यांमध्ये केल्याने स्थानकांवरील गर्दी अनियंत्रित झाली असून, पनवेल (Panvel) स्थानकावर चेंगराचेंगरीसारखी धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. (Panvel Railway)

कोलमडलेले वेळापत्रक आणि वाढती गर्दी

मध्य रेल्वेवर सध्या एकूण ९४ वातानुकूलित फेऱ्या धावत आहेत, ज्यातील १४ फेऱ्या हार्बर मार्गावर सुरू आहेत. मात्र, या फेऱ्यांमुळे सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी धावणाऱ्या सामान्य लोकल गाड्या रद्द करून त्या जागी वातानुकूलित गाड्या चालवल्या जात आहेत. यामुळे सामान्य तिकीट असलेल्या प्रवाशांना पुढच्या गाडीसाठी ताटकळत राहावे लागते. पनवेल स्थानकावरून (Panvel Railway) सुटणाऱ्या गाड्या अनेकदा उशिराने धावत असल्याने मागच्या सर्व गाड्यांचे नियोजन बिघडते. विशेषतः पेण आणि रोह्यावरून येणारे प्रवासी याच स्थानकावर उतरत असल्याने पुलावर आणि जिन्यांवर प्रचंड गर्दी होऊन प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे.

प्रवाशांचा तिकीट दरांवरून संताप

रेल्वे प्रवाशांनी केवळ गर्दीच नव्हे, तर तिकीट दरांबाबतही प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते पनवेल हे ४९ किलोमीटरचे अंतर असून येथील वातानुकूलित मासिक पास २२२५ रुपये आहे. धक्कादायक बाब म्हणजे, तेवढेच अंतर असलेल्या डोंबिवलीसाठीचा पास मात्र २०५० रुपये आहे. सामान्य पासच्या दरांबाबतही अशीच तफावत दिसून येत असून हार्बर मार्गावरील प्रवाशांकडून अधिक भाडे आकारले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. प्रवाशांची वाढती संख्या आणि अपुरी सुरक्षा व्यवस्था यामुळे हार्बर मार्ग सध्या समस्यांचे आगार बनले आहे.

हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post