प्रतिनिधी
Fraud माजी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाचा गैरवापर करून मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) प्रकल्पात घर मिळवून देण्याचे आमिष दाखवत एकाची १.१२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी डोंगरी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू केला आहे. (Fraud)
तक्रारदार शयफान मकबूल शेख (वय २९, रा. डोंगरी) हे या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. आरोपींनी शयफान यांना एमटीएचएल पुनर्वसन प्रकल्पांतर्गत कुर्ला (पूर्व) येथे माजी खासदारांच्या कोट्यातून फ्लॅट मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. यावर विश्वास ठेवून शयफान यांनी जानेवारी २०२५ पासून टप्प्याटप्प्याने तब्बल १.१२ कोटी रुपये आरोपींना दिले. (Fraud)
आरोपींनी विश्वास संपादन करण्यासाठी शयफान यांना सी-विंग, आर-२ मधील फ्लॅट क्रमांक १००५, ११०६, १५०३, ११०८, १००६ आणि १६०७ साठी बनावट वाटप पत्रे (Allotment Letters) आणि ताबा पावत्या दिल्या होत्या. मात्र, ही सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे शयफान यांच्या लक्षात आले. (Fraud)
डोंगरी पोलिसांनी या प्रकरणी युनूस शेख, सचिन यादव, अक्षय रूपवते, हनुमंत देवधरकर आणि फैसल या पाच जणांविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व व्यवहार आणि बैठका वाडीबंदर येथील पी. डी. मेलो रोडवरील जनमोहम्मद बिल्डिंग परिसरात झाल्याचे समोर आले आहे. आरोपींनी अशाच प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. तसेच माजी खासदारांच्या नावाचा वापर नेमका कसा करण्यात आला, या दृष्टीनेही पोलीस अधिक तपास करत आहेत. (Fraud)
