Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवासाठी केडीएमसी आणि पोलिसांची समन्वय बैठक संपन्न; 'या' विषयांवर झाली चर्चा

Ganeshotsav 2026 : गणेशोत्सवासाठी केडीएमसी आणि पोलिसांची समन्वय बैठक संपन्न; 'या' विषयांवर झाली चर्चा

  • कल्याण : प्रतिनिधी

Ganeshotsav 2026 : येत्या १४ तारखेला गणरायाचे आगमन होणार आहे. कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागात गणेशोत्सवादरम्यान कायदा, शांतता आणि सुव्यवस्थेसाठी, तसेच उत्सव निर्विघ्नपणे पार पडावा याकरिता पोलिस आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने बुधवारी सायंकाळी कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीत एक खिडकी योजनेचे सादरीकरण, सायबर सुरक्षा आणि ध्वनी प्रदूषणावर प्रभावी जनजागृती करण्यात आली. ६०० हून अधिक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा या बैठकीत सहभाग होता.

गणेशोत्सव म्हटलं की कल्याण-डोंबिवलीचा उत्साह काही औरच असतो आणि याच उत्सवाला अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि भव्य स्वरूप देण्यासाठी पोलिस आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आता एकाच छताखाली आले आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात बुधवारी सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वपूर्ण समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलिस परिमंडळ ३ आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या बैठकीने आगामी उत्सवाच्या नियोजनाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त संजय जाधव आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल उपस्थित होते. दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंडळांना प्रशासनाचे सर्व सहकार्य मिळेल असे आश्वासन देत, नियमांचे पालन करून उत्सव अधिक आकर्षक करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाची सुरूवात अतिशय मंगलमय वातावरणात बाप्पाच्या विधिवत पूजनाने झाली. संपूर्ण सभागृहात भक्तिमय वातावरण असतानाच प्रशासनाने केवळ परवानग्यांपुरती बैठक न ठेवता त्याला जनजागृतीची जोड दिली. उपस्थितांसाठी दोन अत्यंत प्रभावी लघुपट दाखविण्यात आले. पहिला विषय होता आजच्या डिजिटल युगात वाढलेले सायबर गुन्हे आणि त्यापासून सामान्य नागरिकांनी कशी काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन, तर दुसरा विषय होता गणेशोत्सवात वाजणाऱ्या कर्णकर्कश डीजे आणि ध्वनी प्रदूषणाचे मानवी आरोग्य, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर होणारे गंभीर दुष्परिणाम. या दोन्ही लघुपटांनी उपस्थितांच्या मनावर खोलवर परिणाम केला.

( – पंजाबच्या ड्राफ्ट व्होटर लिस्टमधून नाव वगळल्याने Raghav Chadha आक्रमक! 'कायमचे स्थलांतरित' अशी नोंद; म्हणाले… )

यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या एक खिडकी योजना या अभिनव सॉफ्टवेअरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यापूर्वी गणेश मंडळांना परवानग्यांसाठी वेगवेगळ्या दारात चकरा माराव्या लागत होत्या, मात्र आता या एक खिडकी योजनेमुळे एकाच क्लिकवर सर्व परवानग्या मिळणार आहेत. याचे सविस्तर सादरीकरण पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे करण्यात आले. या निर्णयाचे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

बैठकीचे प्रास्ताविक परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी केले. उपस्थितांशी संवाद साधताना ते म्हणाले, गणेशोत्सव हा केवळ उत्सव नाही तर ती कल्याण-डोंबिवलीची संस्कृती आहे. ही संस्कृती जपत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल पूर्णपणे सज्ज आहे.

या बैठकीत केवळ औपचारिकता न ठेवता मंडपाचे स्ट्रक्चर ऑडिट, विसर्जन मिरवणूक मार्ग, वाहतूक व्यवस्थेत होणारे बदल, पार्किंग व्यवस्था, विद्युत पुरवठ्याची सुरक्षितता, सीसीटीव्ही आणि सुरक्षेच्या उपाययोजना यावर सखोल मंथन झाले. अनेक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या अडचणी थेट अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी त्या अडचणी ऐकून घेऊन जागेवरच संबंधित विभागाला सूचना देऊन तात्काळ निराकरण करण्याचे आदेश दिले. त्यामुळे प्रशासन आणि मंडळांमध्ये एक सकारात्मक संवाद दिसून आला.

या बैठकीला कल्याण परिमंडळातील सुमारे ५५० ते ६०० कल्याण-डोंबिवलीकरांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये लहान-मोठ्या गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह पोलिस मित्र, शांतता समितीचे सदस्य आणि महिला दक्षता समितीच्या सदस्यांचा मोठ्या संख्येने समावेश होता. एकंदरीत ही बैठक गणेशोत्सव २०२६ हा मागील सर्व रेकॉर्ड मोडीत काढत अत्यंत शिस्तबद्ध आणि संस्मरणीय करण्याची नांदी ठरली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post