गोव्याचे सौंदर्य पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या 'महिंद्रा थार' (Thar) आणि नव्याने आलेल्या 'थार रॉक्स' गाड्यांवर आता गोव्यात बंदी येण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांत पर्यटकांकडून रेंटल थार (Thar) गाड्यांचे भीषण अपघात झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर, गोवा सरकार थारच्या नवीन रेंटल परवान्यांवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. परिवहन मंत्री मौविन गोडिन्हो यांनी उच्चस्तरीय बैठकीनंतर हा प्रस्ताव ‘स्टेट ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी’कडे मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
बंदीमागची मुख्य कारणे काय?
परिवहन विभागाच्या मते, थारची (Thar) इंजिन पॉवर खूप जास्त आहे. गोव्याच्या अरुंद रस्त्यांवर वेगामुळे पर्यटक गाडीवरील नियंत्रण गमावतात. अलीकडच्या बहुतांश प्राणघातक अपघातांमध्ये पर्यटक दारूच्या नशेत थार (Thar) चालवत असल्याचे समोर आले आहे. अशा पर्यटकांना सहजासहजी जामीन मिळू नये, यासाठी सरकार कायदा कडक करत आहे. हरियाणाचे माजी डीजीपी ओ.पी. सिंग यांनीही यापूर्वी म्हटले होते की, रस्त्यावर स्टंट आणि हुल्लडबाजी करणाऱ्यांची पहिली पसंती थार (Thar) किंवा बुलेट असते. गाडीची निवड ही चालकाची मानसिकता दर्शवते.
रेंटल कार ऑपरेटर्सना १०,००० रुपयांचा दंड
पर्यटकांसोबतच आता रेंटल कार ऑपरेटर्सवरही कडक कारवाई होणार आहे. कंपन्यांच्या पार्किंग स्पेस आणि कागदपत्रांचे ऑडिट केले जाईल. गाड्यांचा वेग मर्यादित ठेवणारे ‘स्पीड गव्हर्नर’ किंवा ट्रॅकिंग डिव्हाइस बंद आढळल्यास १०,००० रुपयांचा दंड आकारला जाईल. तसेच, खाजगी (व्हाईट प्लेट) गाड्या पर्यटकांना भाड्याने देणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल.
१५ जुलैपासून एआय कॅमेऱ्यांद्वारे ई-चालान
गोव्यात सध्या २६ ठिकाणी अत्याधुनिक एआय (AI) ट्रॅफिक कॅमेरे बसवले आहेत. चाचणी दरम्यान या कॅमेऱ्यांनी एकाच दिवसात ५६,५०० पेक्षा जास्त वाहतूक नियमभंग पकडले आहेत. १५ जुलै २०२६ पासून नियम मोडणाऱ्यांना थेट ऑनलाईन ई-चालान (दंड) पाठवले जातील. डिसेंबर २०२६ पर्यंत या कॅमेऱ्यांची संख्या ९० पर्यंत वाढवली जाणार आहे. (Thar)
