जयेश मेस्त्री
भारतभूमी ही अनादी काळापासून साधू-संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या भूमीने अनेक महान संत, तत्त्वज्ञ आणि विचारवंत घडवले आहेत. या महामानवांनी केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला आध्यात्मिक आणि नैतिक मूल्यांची शिकवण दिली आहे.
हिंदू धर्म (Hinduism) हा जगातील सर्वश्रेष्ठ धर्म आहे. हिंदू एक विशाल संस्कृती आहे, जी अनेक शतकांपासून विविध विचारप्रणाली, श्रद्धा आणि परंपरांना सामावून घेत विकसित झाली आहे. या धर्माची महत्ता केवळ त्याच्या प्राचीनतेत किंवा व्यापकतेत नाही, तर त्याच्या मूलभूत तत्त्वांमध्ये आणि मानवी जीवनाला उन्नत करण्याच्या क्षमतेत आहे.
हिंदू धर्माचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची सर्वसमावेशकता आणि सहिष्णुता. 'एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति' (सत्य एकच आहे, विद्वान ते वेगवेगळ्या प्रकारे सांगतात) हे उपनिषदांमधील वचन या धर्माच्या उदार दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. या धर्माने कधीही एकाच मार्गाचा किंवा एकाच दैवताचा आग्रह धरला नाही. उलट, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या प्रकृतीनुसार आणि आवडीनुसार ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यामुळेच येथे शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य असे अनेक संप्रदाय एकाच छताखाली नांदताना दिसतात. इथे कृष्ण गर्जना करतो आणि बुद्धही नांदतो. ही विविधताच हिंदू धर्माची खरी शक्ती आहे. या सर्व संप्रदायांनी आपापल्या पद्धतीने ईश्वराची उपासना केली आणि मानवी जीवनाचे अंतिम ध्येय मोक्षप्राप्ती हेच असल्याचे सांगितले. या सहिष्णुतेमुळेच हिंदू धर्मात विविध विचारप्रवाह आणि तत्त्वज्ञानांना नेहमीच स्थान मिळाले आहे, ज्यामुळे तो अधिक समृद्ध झाला आहे.
कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग आणि राजयोग यांसारख्या विविध मार्गांनी मोक्षप्राप्तीचा संदेश देणारा हा धर्म मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करतो. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेला उपदेश आजही कोट्यवधी लोकांना प्रेरणा देतो. निष्काम कर्म करण्याची शिकवण, धर्माचे पालन, नीतीमत्ता आणि सदाचार हे हिंदू धर्माचे अविभाज्य अंग आहेत. 'वसुधैव कुटुंबकम्' म्हणजेच सबंध जग एक कुटुंब आहे आणि 'सर्वे भवन्तु सुखिनः' यांसारखी उदात्त मूल्ये या धर्माने जगाला दिली आहेत. यापेक्षा उदात्त असे वैश्विक बंधुत्व कुठे आहे आणि यापेक्षा शांततेचा पुरस्कार करणारा धर्म जगात कुठे आहे, दाखवा तर… या मूल्यांनी केवळ वैयक्तिक जीवनातच नव्हे, तर सामाजिक आणि जागतिक स्तरावरही सलोखा वाढवण्याचे ध्येय विकसित केले आहे.
साधू-संतांची परंपरा हा हिंदू धर्माचा (Hinduism) आत्मा आहे. या संतांनी समाजाला योग्य दिशा दाखवली, अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढींवर प्रहार केले आणि भक्तीच्या माध्यमातून ईश्वराशी एकरूप होण्याचा सोपा मार्ग दाखवला. महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज यांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भक्तीचा एक नवा अध्याय लिहिला. त्यांनी सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या भाषेत अभंग, ओव्या आणि कीर्तनांच्या माध्यमातून अध्यात्मज्ञान दिले. संत तुकाराम महाराजांनी तर 'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले' असे सांगून समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. या संतांनी आध्यात्मिक उपदेश दिला त्याचबरोबर सामाजिक सुधारणांचेही मोठे कार्य केले. त्यांनी समाजातील दुर्बळ घटकांना आधार दिला आणि सर्वांना समानतेने वागवले.
उत्तर भारतात संत कबीर, संत रविदास, मीराबाई, सूरदास यांनी भक्तीचा प्रसार केला. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू, तर दक्षिण भारतात रामानुजाचार्य, माध्वाचार्य यांसारख्या आचार्यांनी तत्त्वज्ञानाची मांडणी केली. या सर्व संतांनी आपल्या आचरणातून आणि विचारांतून समाजाला एकतेचा, प्रेमाचा आणि करुणेचा संदेश दिला. त्यांनी कधीही जातीभेद किंवा वर्णभेद मानला नाही, उलट सर्व मानव समान आहेत हेच शिकवले.
या संतांनी दाखवून दिले की, ईश्वरप्राप्तीसाठी कोणत्याही विशिष्ट वर्णात किंवा जातीत जन्म घेणे आवश्यक नाही, तर शुद्ध मन आणि निस्सीम भक्ती महत्त्वाची आहे. मात्र आज अनेक लोक भोंदूगिरीच्या नावाखाली धर्माचा गैरवापर करताना दिसतात. अशा व्यक्तींना हिंदू धर्माने कधीही पाठिंबा दिला नाही, उलट संतांनी नेहमीच अशा प्रवृत्तींचा निषेध केला आहे. भोंदू आणि ढोंगी व्यक्तींमुळे संपूर्ण धर्माला किंवा साधू-संतांच्या परंपरेला दूषणे देणे हे अयोग्य आहे. सध्या अशोक खरात आणि वसईच्या वैद्यचे प्रकरण जोरात आहे. मात्र यांच्या आडून हिंदू धर्मावरच घाला घालण्याचा प्रयत्न सुरु आहे. ख्रिस्त्यांमध्ये कितीतरी पाद्री आरारारारारा म्हणत लोकांना मूर्ख बनवतात, तेव्हा हे अंधश्रद्धा निर्मूलनवाले कोणत्या बिळात जाऊन लपतात? भोंदू बाबांचा नायनाट झालाच पाहिजे. देश अंधश्रद्धा मुक्त झालाच पाहिजे; पण तुम्ही जी ठरवाल ती श्रद्धा आणि तुम्ही जी सांगाल ती अंधश्रद्धा असं चालणार नाही. उलट स्वर्गात ७२ अप्सरांचा उपभोग करता यावा; म्हणून वसुधा नासधूस करणारे नराधम यांच्या अंधश्रद्धेला कोणत्या तराजूत तोलणार आहात? येशूच्या नावाने अंधश्रद्धेचा पूर वाहतोय त्याकडे कोणत्या दृष्टीने पाहणार आहात? त्यामुळे हिंदूंना ज्ञान द्यायची गरज नाही. हिंदू ही प्रगतशील जमात आहे. आम्ही आमच्यातल्या कालबाह्य रुढी फेकून दिल्या आहेत आणि खूप पुढे गेलो आहोत. मात्र होम-हवन, पूर्जा-अर्चा, साधू संत, अनेकेश्वर हा आम्हा हिंदू धर्माचा पाया आहे. त्यावर कुणी घाला घालू पाहत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही. हिंदू आता जागृत झाला आहे. तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संवैधानिक मार्गाने लढा देतोय व या पुढेही लढा देत राहणार आहे.
या महान परंपरेचा आदर करणे आणि जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. हिंदू धर्माची महत्ता ही त्याच्या उदार विचारांमध्ये, वैश्विक मूल्यांमध्ये आणि साधू-संतांच्या त्यागमय जीवनात दडलेली आहे, जी आजही आपल्याला प्रेरणा देत आहे.
या परंपरेचे योग्य आकलन करून, त्यातील उदात्त मूल्यांचे आचरण करणे हेच खऱ्या अर्थाने हिंदू धर्माचे पालन करणे होय. पण हिंदू धर्माचे रक्षणकर्ते हे साक्षात महादेवस्वरूप छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आहेत, एवढे मात्र लबाडांनी, स्वयंघोषित पुरोगाम्यांनी लक्षात घ्यावे.
