कल्याण, प्रतिनिधी
Hindusthan Post Impact ‘केडीएमसीच्या उद्यान विभागाचा अजब कारभार : फांद्या न छाटताच ऑनलाईन तक्रार निकाली’ या मथळ्याखाली हिंदुस्थान पोस्ट ने गुरूवारी २३ जुलै रोजी सचित्र वृत्त प्रसारित केले होते.
या वृत्ताची कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने दखल घेऊन धोकादायक झाडांच्या फांद्या छाटून टाकल्या. या कारवाईमुळे कल्याण पूर्वेकडे असलेल्या समता सोसायटी परिसरातील रहिवाशांनी तूर्त समाधान व्यक्त केले असले तरीही या झाडांमुळे धोका मात्र कायम दिसत आहे आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचा निष्काळजी आणि बेजबाबदार कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे. ऑनलाईन पोर्टलवर काम पूर्ण दाखवून तक्रार निकाली काढायची आणि प्रत्यक्षात धोका कायम ठेवायचा, ही केडीएमसीची पद्धतच झाल्याची झोड उठवून समाज माध्यमांवर नेटकऱ्यांकडून चौफेर टीका केली जात आहे. (Hindusthan Post Impact)
कल्याण पूर्वेकडे असलेल्या समता सोसायटीच्या आवारात सुमारे ४० वर्षे जुनी पिंपळ आणि जांभूळ ही दोन धोकादायक झाडे तेथील रहिवाशांच्या जिवावर उठली आहेत. वाढलेल्या अनावश्यक फांद्या आणि उंचीमुळे पावसाळ्यात केव्हाही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या संदर्भात सोसायटीचे सदस्य कल्पेश गायकवाड यांनी ४ जून रोजी केडीएमसीच्या पोर्टलवर या धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याची तक्रार नोंदविली होती. मात्र प्रत्यक्षात एकही फांदी न छाटता २९ जुलै रोजी काम पूर्ण झाले, असे नमूद करून तक्रार निकाली काढण्यात आली. प्रत्यक्षात झाडे आजही तशीच असून पिंपळाचे झाड धोकादायकरीत्या झुकले आहे. दुसरीकडे समता सोसायटीतील रहिवाशांनी याच प्रकारची तक्रार केली होती. ती २१ जुलै रोजी काम पूर्ण दाखवून बंद करण्यात आली. या प्रकरणी हिंदुस्थान पोस्टने २३ जुलै रोजी वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाला जाग आली. त्यानंतर २८ जुलै रोजी केवळ खालच्या बाजूच्या काही फांद्या छाटण्याचा देखावा करण्यात आला. मात्र झाडांची उंची कमी करण्याचे मूळ काम अद्याप रखडले आहे. रहिवाशांनी अनेकदा तक्रार केली. मात्र उद्यान विभागाने ऑनलाईन तक्रार पोर्टलवर काम पूर्ण झाले, असे नमूद करून हात झटकले. (Hindusthan Post Impact)
हिंदुस्थान पोस्टमध्ये वृत्त येताच खळबळ
या प्रकरणाचे वृत्त हिंदुस्थान पोस्टमध्ये प्रसिद्ध होताच महापालिका प्रशासनाला जाग आली. २८ जुलै रोजी केवळ खालच्या बाजूच्या काही फांद्या छाटण्याचा देखावा करण्यात आला. मात्र मूळ मागणी असलेली झाडांची उंची कमी करण्याचे काम अजूनही झालेले नाही. सुमारे ५० फूट उंच असलेली ही झाडे आजही तशीच उभी आहेत. या पार्श्वभूमीवर तक्रारदारांनी आरोप केला आहे की झाडांची उंची कमी करण्यासाठी क्रेन आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज आहे, जी विभागाकडे उपलब्धच नाही. त्यामुळे केवळ औपचारिकता म्हणून खालच्या फांद्या छाटून विषय संपविण्यात आला आहे. (Hindusthan Post Impact)
काम पूर्णचा दावा… अन् धोका मात्र कायम
याच प्रकरणात कुटुंबीयांनी ४ जुलै रोजी आपले सरकार पोर्टलवरही तक्रार केली होती. धक्कादायक बाब म्हणजे २८ जुलै रोजी दुपारी १२.१४ वाजता एका व्यक्तीकडून फांद्या छाटण्याचे काम सुरू असतानाच पोर्टलवर तक्रार निकाली झाल्याचा मेसेज आला. म्हणजे काम पूर्ण होण्याआधीच कागदावर फाईल बंद करण्यात आली आहे. अर्थात काम पूर्णचा दावा केला असला तरीही इमारतीतील रहिवाशांना धोका मात्र कायम असल्याचे दिसून येते. (Hindusthan Post Impact)
तक्रार निवारण यंत्रणेची पोलखोल
या संदर्भात विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्याने पावसाळा संपल्यानंतर उंची कमी करू, असे तोंडी आश्वासन दिले आहे. पण पावसाळा संपेपर्यंत एखादी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल रहिवाशांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे केडीएमसीच्या ऑनलाईन तक्रार निवारण यंत्रणेची पोलखोल झाली आहे. प्रत्यक्ष काम न करता तक्रारी बंद करण्याची ही पद्धत तातडीने बंद करावी, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि धोकादायक झाडे त्वरित सुरक्षित करावीत, अशी मागणी समता सोसायटीतील रहिवाशांनी केली आहे. (Hindusthan Post Impact)

