ऋजुता लुकतुके
India Asian Games cricket 2026 : जपानमधील आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट संघाची मोहीम २९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारताला उपउपान्त्य फेरीत प्रवेश मिळाला असून, या सामन्यात भारताचा सामना ग्रुप 'ए'मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशीहोणार आहे.
या गटात अफगाणिस्तान, जपान आणि नेपाळचा समावेश आहे.
भारतासोबत पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका या चार संघांनाही त्यांच्या क्रमवारीमुळे थेट उपउपान्त्य फेरीत स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे भारताला साखळी फेरीतील सामने खेळावे लागणार नाहीत. पुरुष क्रिकेट स्पर्धेतील प्राथमिक सामने २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान होतील आणि त्यानंतर २८-२९ सप्टेंबरला बाद फेरीचे सामने रंगतील.
भारताचा उपउपान्त्य फेरीतील संभाव्य प्रतिस्पर्धी अफगाणिस्तान, जपान किंवा नेपाळ यापैकी दुसऱ्या क्रमांकावर राहणारा संघ असेल. त्यामुळे यजमान जपानविरुद्ध भारताची लढत होण्याची शक्यताही कायम आहे. भारताने २०२२च्या होआंगझाओ आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष क्रिकेटचे सुवर्णपदक जिंकले होते आणि यंदाही तोच किताब कायम ठेवण्याचे लक्ष्य असेल. भारताचा १५ सदस्यीय संघ पाहता ही केवळ युवा किंवा दुय्यम संघाची मोहीम नाही. श्रेयस अय्यर कर्णधार, तर तिलक वर्मा उपकर्णधार आहे. संघात संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशन, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांसारखे खेळाडू आहेत. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांचा समावेश आहे. विशेष आकर्षण अर्थातच वैभव सूर्यवंशी असेल.
पुरुषांची क्रिकेट स्पर्धा टी२० स्वरूपात खेळवली जाणार असून अंतिम सामना ३ ऑक्टोबरला होईल. भारतासाठी ही स्पर्धा सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याची संधी आहे.
महिला क्रिकेटमध्येही भारत गतविजेता आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील महिला संघाचा पहिला सामना १८ सप्टेंबरला यजमान जपानविरुद्धहोणार आहे. म्हणजेच आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा असतील.
हेही पहा –

