Indus Water Treaty : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलकरार (Indus Waters Treaty) स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यापासून भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव (India-Pakistan Tension) कायम आहे.
अशातच पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP)चे अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांनी पुन्हा एकदा भारतावर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. “सिंधू नदीवरील पाकिस्तानच्या पाणी हक्कांमध्ये हस्तक्षेप झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील”, असा इशारा देतानाच त्यांनी पाकिस्तानच्या ‘अण्वस्त्र धोरणाचाही’ उल्लेख केला.
बिलावल यांनी इस्लामाबादमध्ये आयोजित सिंधू जलकरारावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना, “सिंधू नदी ही पाकिस्तानची जीवनवाहिनी आहे. तिच्या प्रवाहाला रोखण्याचा किंवा पाण्याचा दबावासाठी वापर करण्याचा कोणताही प्रयत्न हा आमच्या राष्ट्राच्या अस्तित्वावरील धोका मानला जाईल,” असे म्हटले. त्यांनी भारतावर ‘पाण्याचे शस्त्रीकरण’ (Weaponisation of Water) केल्याचा आरोपही केला.
अण्वस्त्र धोरणाचा उल्लेख
भाषणादरम्यान बिलावल यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेचा संदर्भ देत, पाण्याशी संबंधित गंभीर संकटेही देशाच्या अण्वस्त्र धोरणाच्या चौकटीत विचारात घेतली जाऊ शकतात, असे सूचित केले. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची दोन्ही देशांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. मात्र त्यांनी थेट अण्वस्त्र वापरण्याची घोषणा केली नसून, पाकिस्तानच्या ‘राष्ट्रीय प्रतिसाद’ आणि ‘न्यूक्लिअर डॉक्ट्रिन’चा संदर्भ दिला.
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात अनेक कठोर पावले उचलली होती. त्याचाच भाग म्हणून १९६० चा सिंधू जलकरार स्थगित करण्यात आला. भारताने स्पष्ट केले आहे की, सीमापार दहशतवादाविरोधात पाकिस्तानकडून ठोस आणि विश्वासार्ह कारवाई होईपर्यंत हा निर्णय कायम राहील.
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहीम
भारताच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावरही राजनैतिक प्रयत्न वाढवले आहेत. इस्लामाबादमध्ये आयोजित परिषदेत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनीही सिंधू जलकरार एकतर्फी स्थगित करणे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात असल्याचा दावा केला. पाकिस्तानकडून पाण्याचा पुरवठा कमी करणे हे ‘युद्धजन्य कृत्य’ (Act of War) ठरू शकते, अशी भूमिकाही मांडण्यात आली.
सिंधू जलकराराचे महत्त्व काय?
जागतिक बँकेच्या मध्यस्थीने १९६० मध्ये, भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू जलकरार झाला होता. या करारानुसार सिंधू नदी प्रणालीतील पाण्याचे वाटप दोन्ही देशांमध्ये निश्चित करण्यात आले. भारताने अनेक युद्धे आणि तणावपूर्ण परिस्थितीतही हा करार कायम ठेवला होता. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर प्रथमच भारताने तो स्थगित करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे दोन्ही देशांतील पाणीवाटपाचा प्रश्न पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय बनला आहे.
