- मुंबई प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत गुरुवारी उद्योग विभागाने तब्बल १ लाख ७३ हजार कोटींच्या औद्योगिक गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले.
त्यानुसार शाश्वत ऊर्जा निर्मिती क्षेत्रामध्ये कार्यरत असलेला जेडब्ल्यू ग्लोबल उद्योग समूह (JW Global Group) राज्यात तब्बल १ लाख ६५ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. तर पश्चिम बंगालमधील श्याम स्टील उद्योग समूह चंद्रपूर जिल्ह्यात १० हजार कोटींची गुंतवणूक (Investment) करून स्टील उद्योग उभारणार आहे.
जेडब्ल्यू ग्लोबल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राज्यात जवळपास एक लाख ६५ हजार कोटींची गुंतवणूक (Investment) करीत आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात फ्लोटिंग सोलर पावर अँड एनर्जी स्टोरेजच्या माध्यमातून कंपनी १४ हजार ९७६ कोटींची गुंतवणूक करीत असून त्यामुळे कायमस्वरूपी ५०० रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच शाश्वत कृत्रिम बुद्धिमत्ता कॅम्पस आणि डाटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, स्मॉल मॉड्युलर न्यूक्लिअर रिऍक्टर या क्षेत्रात जेडब्ल्यू ग्लोबल उद्योग समूह गुंतवणूक करीत आहे. या संपूर्ण गुंतवणुकीमुळे राज्यात जवळपास ३ हजार रोजगार निर्मिती अपेक्षित आहे.
तर श्याम स्टील उद्योग समूह चंद्रपूर जिल्ह्यात गोडपिंपरी तालुक्यामध्ये १० हजार कोटीची गुंतवणूक (Investment) करून स्टील उद्योग उभारत आहे. या माध्यमातून जवळपास ८ हजार पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे. दरम्यान, राज्यात गुंतवणूक येऊन त्याचे उद्योगात रूपांतर करण्यासाठी अनेक धोरणात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत. राज्य सरकार महाराष्ट्रामध्ये उद्योग उभारण्यासाठी गुंतवणूकदारांना पुरेपूर सहकार्य करीत आहे. त्यामुळे राज्यामध्ये सद्यस्थितीत उद्योगांचे नवे पर्व सुरू झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
राज्यात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दाखविलेल्या उद्योग समूहांना प्रत्यक्षपणे उद्योग सुरू करण्यास सुटसुटीत प्रक्रिया करण्यात आली आहे. राज्याच्या कुठल्याही भागामध्ये गुंतवणूक (Investment) करण्यास स्वारस्य दाखवल्यास राज्य सरकार (State Govt) संबंधित उद्योग समूहाला पुरेपूर सहकार्य करेल, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.
