ऋजुता लुकतुके
IPL 2026 : दुसरे आयपीएल विजेतेपद मिळवण्याच्या उद्देशाने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) संघ यंदा मैदानात उतरेल. मागील हंगामात गुजरातने चांगली कामगिरी करत बाद फेरीपर्यंत मजल मारली होती, मात्र मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) २० धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
२०२२ मध्ये पदार्पणातच विजेतेपद आणि २०२३ मध्ये उपविजेतेपद मिळवणाऱ्या गुजरात टायटन्सकडून यंदाही मोठ्या अपेक्षा आहेत. कर्णधार शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली संघ पुन्हा एकदा विजेतेपदासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे.
फलंदाजी विभागात गुजरात एवढा मजबूत संघ स्पर्धेत दुसरा नसेल. शुभमन गिल, जोस बटलर आणि साई सुदर्शन हे तिघे संघाला दमदार सुरुवात देऊ शकतात. विशेष म्हणजे, साई सुदर्शनने मागील हंगामात ७५९ धावा करत ऑरेंज कॅप जिंकली होती, ज्यामुळे तो संघाचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरतो.
गोलंदाजी विभागातही गुजरात टायटन्स मजबूत दिसत आहे. कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांसारखे वेगवान गोलंदाज संघाकडे आहेत. प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) मागील हंगामात २५ बळी घेत पर्पल कॅप जिंकली होती, ज्यामुळे त्याची भूमिका यंदाही अत्यंत महत्त्वाची असेल.
