कल्याण : प्रतिनिधी
Kalyan : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या (Ambivali Station) बाळकृष्ण पेपर मीलमध्ये सहाय्यक प्रमुख पदावर कार्यरत असलेले ज्येष्ठ अधिकारी प्रदीप रिंगासिया (६६) यांच्या कारवर शहाड येथे तिघा सशस्त्र हल्लेखोरांनी लोखंडी सळईने हल्ला केला.
याच दरम्यान चेंबूरमधून त्यांना धमकावण्यात आले. फोन करणाऱ्याने तर थेट कुटुंबासह ढगात पाठविण्याची धमकी दिली. बहुदा खंडणीसाठी हल्ल्यासह धमकावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून या घटनेनंतर औद्योगिक वर्तुळात वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास चक्रांना वेग दिला आहे. (Kalyan)
रिंगासिया (Pradeep Ringasia) यांना फोन करून धमकी देणारा मयुर गणेश शिंदे असल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. धमकी देणारा मुंबईच्या चेंबूर भागातील गौतमनगरमध्ये राहणारा असल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात संध्याकाळच्या सुमारास प्रदीप रिंगासिया हे बाळकृष्ण पेपर मीलमधून (Balkrishna Paper Mill) कारने घरी जात होते. सोबत स्वंयपाकी प्रकाश पुरोहित होता. दीप ज्योती सोसायटीजवळ वळण घेऊन हॅप्पी होम सोसायटीजवळून मंगेश प्लाॅटच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरून जात असताना, अचानक कारच्या समोर तीन जण आले. त्यांच्या हातात लोखंडी सळ्या होत्या. काही कळण्याच्या आत त्यांनी कारवर हल्ला चढविला. दर्शनी भाग आणि दरवाजांच्या काचा फुटून तुकडे प्रदीप रिंगासिया यांच्या अंगावर उडाले. हल्ला होत असल्याचे लक्षात येताच कार वेगात पळविली. पुढे जाऊन थांबलो असता तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते. तेथील एका सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाने तीन इसम हातात लोखंडी सळ्या घेऊन या भागात दुपारपासून फिरत होत असल्याची माहिती दिली. या घटनेची माहिती दिल्यानंतर खडकपाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. (Kalyan)
चेंबूरमधून बोलतोय…कुटुंबासह ढगात पाठवीन
या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी रात्री प्रदीप रिंगासिया यांना त्यांच्या मोबाईलवर चेंबूर येथून गणेश शिंदे (Ganesh Shinde) बोलतोय असे सांगणाऱ्याने फोन केला. तू उद्यापासून त्या कंपनीत दिसता कामा नये. आमच्या हातून थोडक्यात बचावला आहेस. परत तेथे दिसला तर तुझ्या सकट बोईसर येथे राहत असलेल्या कुटुंबाला ठार मारू, अशी त्याने धमकी दिल्याचे प्रदीप रिंगासिया यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघा सशस्त्र हल्लेखोरांसह धमकी देणारा गणेश शिंदे अशा चौघांच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या हल्ल्यामागे खंडणीचा प्रकार असावा, अशी चर्चा आहे. ६६ वर्षांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यावर दहशतीचा प्रयत्न केल्यामुळे आंबिवली, मोहने औद्योगिक परिसरातील उद्योजक आणि कामगारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Kalyan)
