कल्याण, प्रतिनिधी
Kalyan २०१६ साली प्रदर्शित झालेल्या सैराट चित्रपटाने आंतरजातीय प्रेम आणि ऑनर किलिंगचा विदारक चेहरा समाजासमोर आणला होता. चित्रपटाच्या शेवटी आर्ची आणि परश्याची निर्घृण हत्या दाखवून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी समाजाला अंतर्मुख केले होते.
कल्याण पश्चिमेतील पारेकरवाड्यात सोमवारी २५ मे रोजी घडलेल्या गायत्री शिंदे हत्याकांडाने पुन्हा एकदा सैराटची कथा प्रत्यक्षात उतरल्याने हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या हत्याकांडातील विनोद दत्तात्रय वसईकर (५०) आरोपीला अटक केली. आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मुलीची हत्या केल्याची आरोपीने कबुली दिल्याचे पोलिसांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले. (Kalyan)
सैराटची कथा… अन् रचना रॉयलमधील वास्तव
सैराटमध्ये आर्ची एका उच्चजातीय कुटुंबातील मुलगी असते. ती खालच्या जातीतील परश्याच्या प्रेमात पडते. दोघे घरातून पळून जाऊन लग्न करतात, संसार थाटतात. मात्र काही वर्षांनी आर्चीचा भाऊ आणि वडील गोड बोलून त्यांच्या घरी येतात आणि रात्री झोपेत असताना दोघांची निर्घृण हत्या करतात. कल्याणच्या रचना रॉयल इमारतीत घडलेली घटना याच कथेशी मिळतीजुळती आहे. गायत्री वसईकर हिने नोव्हेंबर २०२५ मध्ये भिवंडी येथील अक्षय शिंदे याच्याशी प्रेमविवाह केला होता. अक्षय अन्य जातीचा असल्याने गायत्रीचे वडील विनोद वसईकर (५०) यांचा या लग्नाला तीव्र विरोध होता. मुलीमुळे समाजात नाक कापलं गेलं, ही भावना त्यांच्या मनात होती. (Kalyan)
एका झटक्यात मुलीला संपविले
रविवारी २४ मे रोजी संपूर्ण कुटुंब एकत्र चित्रपट पहायला गेले, फिरायला गेले. सैराट चित्रपटामध्ये जसे आर्चीचे घरचे गोड बोलून आले होते, तसाच काहीसा प्रकार इथेही दिसला. मात्र सोमवारी २५ मे रोजी दुपारी घरात एकटी असलेल्या गायत्रीचा विनोद वसईकर याने धारदार शस्त्राने खून केला. एका झटक्यात मुलीला संपवून तो भूमिगत झाला. मजलदरमजल करत अंबरनाथला पोहोचला. गेल्या पाच दिवसांपासून गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत आंधळे आणि त्यांचे पथक त्याला जंग जंग पछाडत होते. (Kalyan)
अंबरनाथच्या फुटपाथवरून चतुर्भुज
याच दरम्यान खासगी गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीनुसार गायत्रीचा खुनी पिता विनोद वसईकर अंबरनाथ परिसरात मिळेल त्या जागेवर उघड्यावर राहत होता. ही माहिती मिळाल्यानंतर बाजारपेठ पोलिस ठाण्याचे बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेशसिंग गौड, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोनि बाबासाहेब दुकले यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत आंधळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने माग काढत फरार खुनी विनोद वसईकर याला अंबरनाथमधून अटक केली. चौकशीत त्याने मुलीच्या आंतरजातीय विवाहाचा राग मनात होता, म्हणून हत्या केल्याची कबुली दिली आहे. (Kalyan)
१० वर्षे उलटूनही सैराट संपेना
सैराट येऊन १० वर्षे झाली. तरीही समाजाची मानसिकता बदललेली नाही. एकविसाव्या शतकात २०२६ सालातही जातीपातीच्या नावाखाली जन्मदाता बापच मुलीचा काळ बनतो, हे चित्र बदलत नाही. कायद्याने आंतरजातीय विवाहाला मान्यता दिली असली तरी समाजाच्या मनातील जात अजूनही गेलेली नाही. सैराट हा केवळ चित्रपट नव्हता, तो समाजाचा आरसा होता. कल्याणच्या घटनेने तो आरसा पुन्हा एकदा रक्ताने माखला आहे. शिक्षण वाढले, पण जातीयतेचा विळखा अजूनही कायम आहे. अशा ऑनर किलिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायद्याची आणि समाजप्रबोधनाची गरज आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. (Kalyan)
