कल्याण, प्रतिनिधी
Kalyan Crime कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळ असलेल्या इराणी काबिल्यातील काही उन्मत्त तरूणांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. गाड्यांचा कट मारल्याच्या किरकोळ वादातून २ ते ३ तरूणांनी रिक्षातील प्रवासी भावेश पाटील यांना भररस्त्यात बेदम मारहाण केली.
मध्यस्थी करणाऱ्या त्यांच्या पत्नीला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली आणि पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पोबारा केला. (Kalyan Crime)
रात्री १० वाजता स्टेशन परिसरात थरार
बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास भावेश पाटील हे पत्नीसह आंबिवली स्टेशन परिसरातून रिक्षाने घरी जात होते. त्याचवेळी रस्त्यावर कट मारल्याच्या कारणावरून काही तरूणांनी पाटील यांची रिक्षा अडवली. वाद वाढताच हिंसक सतरूणांनी पाटील यांना रिक्षातून ओढून भररस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. पाटील यांना वाचविण्यासाठी मधे पडलेलेल्या त्यांच्या पत्नीला देखील धक्काबुक्की करण्यात आली. झटापटीदरम्यान हल्लेखोरांनी भावेश पाटील यांच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने खेचून पोबारा केला. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. मात्र पाटील दाम्पत्याला वाचविण्यासाठी एकही मधे पडला नाही. (Kalyan Crime)
भाविकांच्या बसवर हिंसक इराण्यांची दगडफेक
कारवाईत कसुरी केली जात असल्याने हिंसक इराण्यांच्या मनोधैर्यात वाढ होताना दिसत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यापूर्वीही गाडीला कट मारल्याचे निमित्त साधून राज्याच्या विविध भागात देवदर्शन करून अटाळी गावात परतणाऱ्या भाविकांच्या बसवर १० महिला-पुरुषांच्या इराणी टोळीने हल्ला करून दगडफेक केली. या हल्ल्यात दुर्गेश राजेश पाटील या २४ वर्षीय तरूणासह कविता पाटील आणि सुवर्णा पाटील या दोन महिलाही दगड लागून जखमी झाल्या. ही घटना जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडली होती. (Kalyan Crime)
खडकपाडा पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू
या हल्ल्यात भावेश पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पाटील यांनी दिलेल्या जबानीवरून खडकपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या मारहाण, महिलेशी असभ्य वर्तन आणि जबरी चोरी कलमांन्वये गुन्हा नोंदवून फरार हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. (Kalyan Crime)
भयग्रस्त रहिवाशांकडून कठोर कारवाईची मागणी
चेन स्नॅचिंग आणि चोऱ्यांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या आंबिवलीच्या इराणी काबिल्यामधील तरूणांची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत आहे. भर रस्त्यात स्थानिक कुटुंबावर हल्ला करण्यापर्यंत या टोळीची मजल गेली आहे. या घटनेमुळे आंबिवली, आटाळी, मोहने गाव आणि परिसरातील रहिवाशांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी अशा उन्मत्त प्रवृत्तीचा तात्काळ आणि कायमचा बंदोबस्त करावा. हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करून रहिवाशांना सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी आक्रमक मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. (Kalyan Crime)
