Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Kalyan : घरफोडीच्या गुन्ह्याचा २४ तासांत उलगडा; ४.५० लाखांचा ऐवजासह दोघे चोरटे चतुर्भुज

Kalyan : घरफोडीच्या गुन्ह्याचा २४ तासांत उलगडा; ४.५० लाखांचा ऐवजासह दोघे चोरटे चतुर्भुज

  • कल्याण, प्रतिनिधी

Kalyan कल्याण पूर्वेकडे असलेल्या नेतीवली परिसरात बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि घरगुती साहित्य लंपास करून भूमिगत झालेल्या दोघा चोरट्यांना कोळसेवाडी पोलिसांनी अवघ्या २४ तासात जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.

पोलिसांनी या चोरट्यांकडून आतापर्यंत तब्बल ४ लाख ५० हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नदीम लियाकत खान (३१) आणि राम प्रकाश गायकवाड (३६) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे असून हे दोघेही नेतीवलीच्या भुई डोंगरीवर असलेल्या आनंदनगरमध्ये राहणारे आहेत. कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (Kalyan)

नेतीवलीतील आनंदनगरमध्ये राहणारे संजय भगवान कांबळे (४५) यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, गॅस सिलेंडर, मोबाईल, पंखा, रोख रक्कम आणि इतर साहित्य चोरून नेले होते. या प्रकरणी कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी २३ जुलै रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१ (३), ३३१ (४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल केला होता. रहिवाशाचे संपूर्ण घर साफ करून परागंदा झालेल्या चोरट्यांना हुडकून काढणे पोलिसांपुढे आव्हान होते. पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक होनमाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन पगार यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाचे निरीक्षक विजय खेडकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप भालेराव, विशाल वाघ, गोरखनाथ घुगे, सचिन आढाव, रोहित बुधवंत, सुरेंद्र इंगळे, दिलीप कोती आदींच्या पथकाने तपास चक्रांना वेग दिला. या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवून नदीम खान आणि राम गायकवाड या दोघांना ताब्यात घेतले. (Kalyan)

चौकशीदरम्यान या दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीस गेलेले ३२ ग्रॅम वजनाचे सोने-चांदीचे दागिने, मोबाईल फोन, ५ हजारांची रोकड आणि इतर मुद्देमाल असा एकूण ४ लाख ५० हजार रूपये किंमतीचा ऐवज जप्त केल्याचे सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक होनमाणे यांनी सांगितले. एकीकडे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांनी यापूर्वी किती व कुठे कुठे चोऱ्या-घरफोड्या केल्या आहेत? याचा चौकस तपास पोलिस करत आहेत. तर दुसरीकडे घरफोडीचा गुन्हा जलद गतीने उघड केल्याने परिसरातील रहिवाशांनी पोलिसांच्या कार्यवाहीचे कौतुक केले आहे. (Kalyan)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post