कल्याण, प्रतिनिधी
Kalyan केवळ थंड पाण्याची बाटली देण्यास इन्कार केला नकार म्हणून कल्याण पूर्वेतील एका हॉटेल चालकाला रस्त्यावर बसून मद्यपान करणाऱ्या टोळक्याने शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मेट्रो मॉल परिसरात घडलेला हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, काही तरूण नेतिवलीतील आनंद नगर परिसरात असलेल्या मेट्रो मॉलसमोर रस्त्याच्या कडेला बसून मद्यपान करत होते. त्यांनी जवळच्या हॉटेल चालकाकडे कोल्ड्रिंक्सची मागणी केली. मात्र हॉटेल चालकाने काही कारणास्तव कोल्डिंक्सच नाही तर थंड पाण्याची बाटली देण्यास इन्कार केला. याचा राग मनात धरून संतप्त झालेल्या दारूड्यांनी हॉटेल चालकाला शिवीगाळ करत भररस्त्यात झोडपून काढले. हा सारा प्रकार तेथे लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालानसला तरीही पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा आरोपींचा शोध घेत आहेत. (Kalyan)
महिलांसह ज्येष्ठांमध्ये दहशत
मेट्रो मॉल, नेतिवली, आनंद नगर परिसरात रात्रीच्या वेळी दारुडे आणि नशेखोरांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. अनेकदा हे लोक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालत असल्याने स्थानिक रहिवाशांना, विशेषतः महिलांसह ज्येष्ठांना नाहक त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे याच परिसरात काही दिवसांपूर्वी नशेच्या अवस्थेतील काही बदमाशांनी अनेक घरांची तोडफोड केल्याची गंभीर घटनाही घडली होती. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. (Kalyan)
पोलिस गस्त वाढवण्याची मागणी
कल्याण पूर्वेतील हा परिसर दिवसेंदिवस असुरक्षित होत चालला आहे. केवळ एका पाण्याच्या बाटलीवरून जर मारहाण होत असेल, तर सामान्य नागरिकांनी जगायचे कसे? पोलिस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या भागातील कायदा-सुव्यवस्था पूर्ववत करावी, अशी अपेक्षा वजा मागणी या भागातील त्रस्त झालेल्या रहिवासी, दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी केली आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले आहेत. रात्रीच्या वेळी मेट्रो मॉल परिसरात दारुड्यांचा हैदोस असतो. पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून दहशत माजविणाऱ्या नशेखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्रस्त स्थानिक रहिवाशांनी केली आहे. (Kalyan)
