कल्याण, प्रतिनिधी
Kalyan महागाईने आधीच सामान्यांचे कंबरडे मोडले असताना कल्याणात चोरट्या महिलांनी थेट खाद्य तेलाच्या डब्यांवरच डल्ला मारल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
या २ महिला भरदिवसा दुकानाबाहेर ठेवलेले १५ लिटरचे ३ तेलाचे डबे चोरून नेत असल्याची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ सद्या समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल होत आहे. (Kalyan)
हा सारा प्रकार कल्याण पूर्वेतील पत्री पुलाच्या जवळील हनुमान सुपर मार्ट या दुकानात घडला आहे. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या चोरट्या महिलांचा व्हिडिओ पाहून पोलिसही चक्रावले आहेत. सोमवारी दुपारच्या सुमारास २ महिला हनुमान सुपर मार्टमध्ये शिरल्या. एक महिला दुकान चालकाशी आणि कामगारांशी बोलून त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवत होती. तोपर्यंत दुसऱ्या महिलेने दुकानात रचून ठेवलेले तेलाचे डबे उचलायला सुरुवात केली. अगदी शिताफीने आणि बिनधास्तपणे दोघींनी मिळून डबे दुकानाबाहेर काढले. दुकानातील गिऱ्हाईक आणि कामगारांना याचा पत्ताही लागला नाही. (Kalyan)
सीसीटीव्हीमुळे फुटले बिंग
संध्याकाळी दुकानातील मालाचा हिशोब करताना तेलाचे काही डबे कमी असल्याचे दुकान मालकाच्या लक्षात आले. संशय आल्याने त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन्ही महिलांचा ‘ऑपरेशन ऑईल’ कारनामा उघडकीस आला. सदर फुटेजमध्ये दोघींचे चेहरे आणि त्यांची चलाखी स्पष्टपणे दिसत आहे. (Kalyan)
टिळकनगर पोलिसांकडून शोध सुरू
या प्रकारानंतर हनुमान सुपर मार्टच्या मालकाने तात्काळ टिळकनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोन्ही अनोळखी महिलांरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. या महिला सराईत गुन्हेगार आहेत की पहिल्यांदाच त्यांनी असे कृत्य केले, याचा शोध पोलिस घेत आहेत. (Kalyan)
महागाईचा फटका की चोरीची नवी पद्धत?
खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडल्याने आता चोरट्यांनी थेट तेलाच्या डब्यांनाच टार्गेट करायला सुरूवात केली आहे. १५ लिटरच्या १ डब्याची किंमत २५०० ते ३००० रूपये आहे. दिवसाढवळ्या भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे कल्याण पूर्वेतील व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ग्राहक बनून या, बोला आणि माल लंपास करा… ही चोरीची नवी पद्धत आता दुकानदारांसाठी डोकेदुखी ठरत आहे. (Kalyan)
