कल्याण, प्रतिनिधी
Kalyan Station कोणार्क एक्स्प्रेसने ओडिशातून गोव्याला २० किलो गांजा घेऊन निघालेल्या दोघा तस्करांचा डाव कल्याणच्या लोहमार्ग पोलिसांसह आरपीएफने हाणून पाडला आहे.
सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास कल्याण स्टेशनवरच पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. विकी कुमार (२१) आणि कुलदीप मंडल (२३) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे दोघेही ओडिशा राज्यातील रहिवासी आहेत. नेहमीप्रमाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बलाचे पथक सोमवारी पहाटेपासून स्थानक परिसरात गस्त घालत होते. कोणार्क एक्स्प्रेस कल्याण स्थानकात येऊन थांबताच आरपीएफ आणि कल्याण लोहमार्ग पोलिस डब्यात गस्त घालत होते. त्यावेळी दोन तरूण बॅगा घेऊन संशयास्पदरित्या घुटमळताना आढळून आले. पोलिसांची नजर पडताच दोघांची चलबिचल झाली. पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी तत्काळ दोघांना हटकले. (Kalyan Station)
बॅग उघडताच पोलिसही चक्रावले
दोघांची अंगझडती आणि बॅगांची तपासणी केली असता बॅगेत खचाखच भरलेला २० किलो गांजा आढळून आला. चालू बाजारभावाप्रमाणे या गांजाची किंमत लाखोंच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चौकशी दरम्यान आरोपींनी सर्व माहिती दिली. हे दोघेही ओडिशातून गांजाचा साठा घेऊन निघाले होते. ठाणे स्टेशनला उतरून तिथून पुढे गोव्याला माल पोहोचवायचा त्यांचा प्लॅन होता. मात्र कल्याणलाच पोलिसांच्या जाळ्यात अडकले. (Kalyan Station)
पोलिसांना मोठ्या रॅकेटचा संशय
या दोघांच्या मागे मोठे आंतरराज्यीय गांजा तस्करीचे रॅकेट असण्याची शक्यता लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केली आहे. हा २० किलो गांजा नेमका कुठून आणला? गोव्यात कुणाला पोहोचविण्यात येणार होता? आणि या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा समावेश आहे, याचा कस्सून तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली खास पथक करत आहेत. दोन्ही आरोपींच्या विरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kalyan Station)
कल्याण पोलिसांची सतर्क भूमिका
कल्याणसारख्या महत्त्वाच्या जंक्शनवर लोहमार्ग पोलिस आणि आरपीएफची सतर्कता पुन्हा एकदा कामी आली. जर हे तस्कर ठाण्याला उतरून गोव्याला पोहोचले असते, तर मोठ्या प्रमाणात नशेचा साठा बाजारात आला असता. पोलिसांच्या या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे. मोठ्या चतुराईने कारवाई करून ओडिशा-गोव्याची गांजाची रसद तोडणाऱ्या पोलिसांचे त्यांच्या वरिष्ठांकडून कौतुक करण्यात येत आहे. (Kalyan Station)
