- विशेष प्रतिनिधी
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाची जागा महायुतीसाठी प्रतिष्ठेचा आणि संघर्षाचा विषय ठरली आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) आपले चिरंजीव अनिकेत तटकरे (Aniket Tatkare) यांना पुन्हा विधान परिषदेवर पाठवण्यासाठी आग्रही असताना, दुसरीकडे शिवसेनेच्या (शिंदे गट) आक्रमक भूमिकेने महायुतीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
या जागेवरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सुरू असलेली रस्सीखेच आता निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहे. (Konkan Legislative Council)
सुरुवातीला मंत्री भरत गोगावले (Bharatshet Gogawale) यांचे पुत्र विकास गोगावले यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने ही जागा शिवसेनेच्या वाट्याला येईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पालकमंत्रीपदाच्या समीकरणांमुळे तटकरे आणि गोगावले यांच्यात पडद्याआड समझोता झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. असे असतानाच, आता अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी (जुईकर) यांनी रिंगणात उडी घेतल्याने महायुतीसमोर पेच निर्माण झाला आहे. जुईली दळवी यांनी रत्नागिरी येथे जाऊन थेट उमेदवारी अर्ज घेतल्याने या जागेवर केवळ शिवसेनेचाच दावा असल्याचे संकेत दिले आहेत. (Konkan Legislative Council)
जुईली दळवी (जुईकर) या अलिबाग-मुरुड मतदारसंघात केवळ आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांच्या कन्या म्हणूनच नव्हे, तर पंचायत समितीच्या माजी सदस्य म्हणून सक्रिय राजकारणात ओळखल्या जातात. तरुण वर्गातील त्यांची पक्कड आणि शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा त्यांना असलेला पाठिंबा पाहता, त्यांनी अनिकेत तटकरे यांच्या मार्गात मोठे आव्हान उभे केले आहे. तटकरे-गोगावले समझोत्यानंतरही पक्षातील एक गट तटकरेंच्या उमेदवारीला कडाडून विरोध करत असल्याने, दळवींच्या रूपाने ‘बंडखोर’ किंवा ‘दुसरा पर्याय’ समोर आल्याची चर्चा आहे. (Konkan Legislative Council)
या जागेवरून सुरू असलेला हा तिढा सुटणे केवळ महायुतीतील वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेवर अवलंबून आहे. तटकरेंना आपले राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी ही जागा राखणे गरजेचे आहे, तर दुसरीकडे शिवसेनेचा स्थानिक गट ‘आमचा उमेदवारच हवा’ या भूमिकेवर ठाम आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असलेल्या या राजकीय खेळींमुळे कोकणातील महायुतीचे हे समीकरण कोणाच्या बाजूने झुकणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (Konkan Legislative Council)
हेही पहा –
