कोकण (Konkan) किनारपट्टीसह रत्नागिरी जिल्ह्यात वरुणराजाने रौद्ररूप धारण केले असून अविरत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने (IMD) पुढील दोन दिवसांसाठी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
संततधार पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदीने (Jagbudi River) इशारा पातळी ओलांडली असून शहरांमधील सखल भागांत पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. या वाढत्या जलसंकटामुळे स्थानिक प्रशासनाने संपूर्ण आपत्कालीन यंत्रणेला हाय अलर्टवर ठेवले आहे. (Konkan Rain Update)
चिपळूण आणि खेडमध्ये सुरक्षा दलांचा पहारा संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) पंचवीसपेक्षा जास्त जवान आधुनिक साधनांसह चिपळूण येथे दाखल झाले आहेत. हे पथक पुढील अठ्ठेचाळीस तास पूरप्रवण क्षेत्रांवर २४ तास पाळत ठेवून असणार आहे. खेड परिसरातील नागरी वस्त्यांमध्ये पाणी भरण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आंबा घाटात दरड कोसळली; मार्ग बंदरत्नागिरी आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या आंबा घाटात एका मोठ्या डोंगराचा कडा रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. सुदैवाने पोलीस कर्मचारी आणि काही स्थानिक तरुणांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. याशिवाय, खेड-खोपी मार्गावरील कासई शिंदेवाडी येथे मोठी दरड कोसळल्याने रस्त्याचा काही भाग वाहून गेला असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ता दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
साखरपा बसस्थानकाची दैनावस्थापहिल्याच मोठ्या पावसात संगमेश्वर तालुक्यातील साखरपा बसस्थानकाची दुरावस्था झाली आहे. योग्य नियोजनाअभावी संपूर्ण आगार पाण्याखाली गेले असून प्रवाशांना अक्षरशः साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माध्यमांतून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
हेही पहा –
