Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Lasalgaon Onion : दिल्लीला जाणारी 'कांदा एक्स्प्रेस' अडवली! खराब कांद्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Lasalgaon Onion : दिल्लीला जाणारी 'कांदा एक्स्प्रेस' अडवली! खराब कांद्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Lasalgaon Onion : सणासुदीच्या काळात कांद्याच्या दरवाढीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं अतिरिक्त राखीव साठ्यातील कांदा नियोजनबद्ध पद्धतीनं बाजारात उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.

कांद्याच्या वाहतुकीसाठी रेल्वे मालगाडी आणि रस्ते वाहतूक या दोन्ही माध्यमांचा वापर केला जात आहे. बाजारातील स्थिती आणि किमतींचे कल लक्षात घेऊन प्रमुख खरेदी-विक्री केंद्रांना कांद्याचा पुरवठा केला जात आहे. (Lasalgaon Onion News)

४५० टन कांदा २२-२४ तासांत पोहोचणार

दर नियंत्रणाच्या प्रयत्नांचा भाग म्हणून लासलगावहून ४५० टन कांदा घेऊन 'कांदा एक्सप्रेस' दिल्लीकडे रवाना झाली आहे. NCCF आणि नाफेडच्या बफर स्टॉकमधील हा कांदा २१ मालवाहू डब्यांमधून दिल्लीतील आझादपूरसह प्रमुख बाजारपेठांमध्ये पोहोचवला जाणार आहे. रेल्वे वाहतुकीमुळे कांदा कमी खर्चात आणि अवघ्या २२ ते २४ तासांत दिल्लीला पोहोचण्याची अपेक्षा आहे. दिल्लीतील किरकोळ बाजारात कांद्याचा पुरवठा वाढल्यानंतर दर नियंत्रणात येण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. सरकारच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, राखीव साठ्यातील कांदा नाफेडच्या केंद्रीय बाजारासह इतर ठिकाणी ३५ रुपये किलो दरानं किरकोळ विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या विशेष पुरवठ्यानंतर दिल्लीतील कांद्याचे दर किती कमी होतात, याकडे व्यापारी, शेतकरी आणि ग्राहकांचं लक्ष लागलं आहे.(Lasalgaon Onion News)

खराब कांद्याचा आरोप

लासलगाव रेल्वे स्थानकातून बुधवारी दुपारी कांदा घेऊन दिल्लीला निघालेल्या विशेष मालगाडी अर्थात कांदा एक्स्प्रेसला प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रोखल्याने मोठा गोंधळ उडाला. २१ डब्यांच्या गाडीतून खराब कांदा देशात नेला जात असल्याचा आरोप करत त्याची प्रतवारी दाखवण्याची मागणी आंदोलकांनी केली. त्यास रेल्वेसह संबंधित यंत्रणांनी नकार दिला. रेल्वे सुरक्षा दलाने पोलिसांच्या मदतीने आंदोलकांना रेल्वे मार्गावरून हटवले. या गोंधळात कांदा एक्स्प्रेस अर्धा ते पाऊण तासाच्या विलंबाने दिल्लीकडे मार्गस्थ झाली.(Lasalgaon Onion News)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post