ऋजुता लुकतुके
Lionel Messi Retirement : अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मात्र, ही घोषणा अचानक झालेली नव्हती. २०२६ फिफा विश्वचषकाच्या (FIFA World Cup) अंतिम सामन्यात स्पेनकडून अर्जेंटिनाचा पराभव झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी मेस्सीने निवृत्तीचं पत्र लिहिलं होतं.
मात्र, ते त्याने जवळपास सात आठवडे कुणालाही दाखवलं नव्हतं.
१९ जुलैला झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाला स्पेनकडून १-० असा पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर २१ जुलैलाच मेस्सीने आपल्या निवृत्तीचा निर्णय शब्दबद्ध केला. मात्र, वडील जॉर्ज मेस्सी (Jorge Messi) यांच्या प्रकृतीविषयीची चिंता आणि त्यानंतर त्यांचं निधन यामुळे त्याने ही घोषणा पुढे ढकलली. जॉर्ज मेस्सी यांचं ८ ऑगस्टला अर्जेंटिनातील रोसारियो येथे निधन झालं.
निवृत्तीची घोषणा करताना मेस्सीने हा निर्णय अत्यंत वेदनादायी असल्याचं म्हटलं. अर्जेंटिनाच्या जर्सीसाठी गेल्या दोन दशकांत आपण सर्वस्व पणाला लावलं, असं सांगत त्याने चाहत्यांचे आभार मानले. वडिलांच्या निधनानंतर हा निर्णय घेण्याबाबत आपण पूर्वीपेक्षा अधिक ठाम झालो असल्याचंही मेस्सीने स्पष्ट केलं.
मेस्सीने अर्जेंटिनासाठी तब्बल २०७ सामने खेळत १२५ गोल केले. तो देशाचा सर्वाधिक सामने खेळणारा आणि सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने २०२१ आणि २०२४ कोपा अमेरिका तसेच २०२२ मध्ये कतार विश्वचषक जिंकला. २०२६ मध्ये पुन्हा विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचूनही विजेतेपद हुकलं.
मेस्सीने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला पूर्णविराम दिला असला, तरी क्लब फुटबॉलमधील त्याचा प्रवास सुरू राहणार आहे. इंटर मियामीकडून तो खेळत आहे.
हेही पहा –

