LPG Gas Cylinder : सध्या गॅस सिलिंडरबाबत सर्वत्र तणावाचे वातावरण आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे. सरकारच्या माहितीनुसार, एलपीजी घेऊन येणारी भारताची दोन जहाजे होर्मुज सामुद्रधुनी (Strait of Hormuz) सुरक्षितपणे ओलांडून आता लवकरच देशात पोहोचणार आहेत.
'ग्रीन साक्षी' आणि 'ग्रीन आशा' अशी या जहाजांची नावं असून ती भारताच्या ऊर्जा पुरवठ्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची मानली जात आहेत.
या दोन्ही जहाजांमध्ये मिळून ६० हजार टनांपेक्षा जास्त एलपीजी (LPG) आहे. ग्रीन साक्षी ७ एप्रिलपर्यंत आणि ग्रीन आशा ९ एप्रिलपर्यंत भारतात पोहोचण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दोन्ही जहाजे पूर्णपणे सुरक्षित असून त्यामध्ये भारतीय खलाशी आहेत. जहाजांच्या या खेपेमुळे घरगुती गॅसचा पुरवठा स्थिर राहण्यास मदत होईल. एका जहाजात सुमारे ४६ हजार टन आणि दुसऱ्या जहाजात सुमारे १५ हजार टन गॅस आहे.
घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत दिल्लीत सध्या सुमारे ९१३ रुपये आहे. लहान कुटुंबासाठी ५ किलोचा सिलेंडर ३३९ रुपयांत उपलब्ध आहे.
कमर्शियल सिलिंडरचे दर
व्यावसायिक वापरासाठी दिल्लीत १९ किलोंच्या सिलिंडरची किंमत सुमारे २०७८.५ रुपये ते २३०७.५ रुपयांपर्यंत आहे. हॉटेल आणि उद्योगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ४७.५ किलो सिलिंडरची किंमत ५१९२ रुपये ते ५२४८ रुपयांच्या दरम्यान आहे. तसंच सर्वात मोठ्या ४२५ किलो सिलिंडरची किंमत सुमारे ४६,४९७ रुपये ते ४६,९९९ रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मुंबईत घरगुती गॅस ९१२.५० (१४.४ किलो) तर कमर्शियल २०३१ (१९ किलो) आहे.
लहान आणि विशेष सिलिंडरच्या किमती
लहान आणि विशेष वापराच्या सिलिंडरमध्ये २ किलो एलपीजी सिलिंडरच्या (LPG Gas Cylinder) रिफिल सुमारे २५४ रुपयांना मिळतं, तर नवीन सिलिंडर घेताना त्यांची किंमत साधारण ९६२ रुपयांपर्यंत जाते. तसंच ५ किलोच्या नॉन-डोमेस्टिक सिलिंडरची किंमत सुमारे ५४९ रुपये ठेवण्यात आली आहे.
