प्रतिनिधी
Maharashtra Legislature विधानभवनाच्या उपहारगृहात शुक्रवारी काहीतरी वेगळेच घडणार आहे, याची कुणकुण लागताच संपूर्ण यंत्रणा हादरली आहे. एफडीए (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे विधानभवनाला भेट देणार असल्याची माहिती मिळताच, उपहारगृहातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली असून, स्वच्छतेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू झाली आहे.
(Maharashtra Legislature)
तुकाराम मुंढे यांची शिस्त आणि त्यांच्या अचानक धाडींची धास्ती संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. याच धास्तीचा परिणाम म्हणून, गुरुवार संध्याकाळपासूनच विधानभवन उपहारगृहात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. नेहमीच्या लगबगीपेक्षा आजचे वातावरण काहीसे गंभीर आहे. अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत आणि स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड न करता, सर्व पदार्थ अतिशय जबाबदारीने तयार करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. (Maharashtra Legislature)
केवळ अन्नच नव्हे, तर वेटर आणि सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छ आणि व्यवस्थित गणवेश (Uniform) घालण्याचे आदेश व्यवस्थापनाने दिले आहेत. नेहमी ढिलाई असणारे कर्मचारीही आज शिस्तीत काम करताना दिसत आहेत. तुकाराम मुंढे उद्या विधानभवनात पाऊल ठेवण्यापूर्वीच उपहारगृहाचा चेहरामोहरा बदलून टाकण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे. (Maharashtra Legislature)
मुंढे यांच्या धडाकेबाज कार्यशैलीमुळे, उद्याचे चित्र नेहमीच्या उपहारगृहासारखे नसेल, हे मात्र नक्की. प्रशासनातील ‘शिस्तप्रिय अधिकारी’ अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांच्या भेटीमुळे विधानभवनातील कर्मचारीही आता सावध झाले असून, ‘मुंढे येणार’ या एका बातमीने संपूर्ण विधानभवन परिसरात उत्साहापेक्षा भीतीचेच वातावरण अधिक असल्याचे दिसून येत आहे. (Maharashtra Legislature)
