Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनने पुन्हा जोरदार मुसंडी मारली असून, (Maharashtra Mansoon) पुढील २४ तास महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट (Red alert), तर मुंबईसह अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी केला असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्याच्या कुठल्या भागांत, पावसाची स्थिती नेमकी कशी असेल यावर एक नजर…
IMD च्या शुक्रवार, ३ जुलै २०२६ च्या अंदाजानुसार, राज्यात पुढील २४ तासांसाठी मान्सून सक्रिय राहणार असून कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळतील. काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने नद्या-नाले दुथडी भरून वाहणे, सखल भागात पाणी साचणे तसेच डोंगराळ भागांत दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे.
विशेषतः पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला असून, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. या भागांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दुसरीकडे पुणे, कोल्हापूर आणि नाशिकच्या घाटमाथा परिसरातही ३ ते ५ जुलैदरम्यान अतिवृष्टीचा धोका असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, शुक्रवारी सकाळपासूनच मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून काही मार्गांवर वाहतूक संथ झाली आहे. मुसळधार पावसाचा परिणाम उपनगरीय रेल्वे वाहतुकीवरही झाला असून काही लोकल गाड्या विलंबाने धावत असल्याची नोंद आहे.
नागरिकांसाठी IMD कडून महत्त्वाच्या सूचना जारी
- अतिवृष्टीच्या काळात अनावश्यक प्रवास टाळावा.
- नदी, नाले, समुद्रकिनारा आणि धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे.
- डोंगराळ व घाटमाथा भागात दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन सावध राहावे.
- वीजांचा कडकडाट होत असल्यास उघड्या जागेत थांबू नये.
- स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करावे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस राज्यात मान्सूनचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथा भागांत अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी सुरू राहतील.
:Ashadhi Wari : आषाढीसाठी भुसावळ-पंढरपूर विशेष रेल्वे धावणार; रक्षा खडसेंकडून संपूर्ण प्रवास 'मोफत'
