प्रतिनिधी
Marathwada : पावसाळ्याचे तीन महिने उलटून गेल्यानंतरही मराठवाड्यात अनेक भागांत अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप पिकांवर संकटाचे सावट गडद झाले असून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
पावसाअभावी अनेक ठिकाणी पिकांनी माना टाकल्याचे चित्र असून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लातूर शहरासह परिसरातील नागरिकांच्या पाणीपुरवठ्याचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मांजरा धरणातील पाणीसाठाही चिंतेचा विषय बनला आहे. धरणात सध्या केवळ साडेतेरा टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने आगामी काळातील पाणीप्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचे संकटही निर्माण होऊ शकते.
या पार्श्वभूमीवर लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे मराठवाड्यातील पावसाची स्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी मांडत सरकारने उपलब्ध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची मागणी केली.
( – कोकणवासियांच्या आग्रहाला मान; Modi Express च्या तारखेत बदल, किती तारखेला ट्रेन धावणार? )
कृत्रिम पावसाच्या प्रयोगामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याची उदाहरणे असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीत ज्या भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल, त्या ठिकाणी कृत्रिम पावसाचा प्रयोग करता येऊ शकतो. त्यामुळे पिकांचे होणारे संभाव्य नुकसान काही प्रमाणात टाळण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
कृत्रिम पावसाचा प्रयोग कितपत यशस्वी होईल, याबाबत निश्चितता नसली तरी संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचा विश्वास बळीराजाला देणे गरजेचे आहे, असे देशमुख यांनी सांगितले. सध्या शेतकरी डोळ्यात प्राण आणून आभाळाकडे पाहत आहे; मात्र पावसाची चिन्हे दिसत नसल्याने त्याची चिंता वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, महाराष्ट्रातील तमाम बळीराजाच्या वतीने सरकारला साकडे घालत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने कृत्रिम पावसाबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांत हा प्रयोग युद्धपातळीवर राबवावा, अशी आग्रही मागणी माजी आमदार धीरज देशमुख यांनी केली आहे.
हेही पहा –

