प्रतिनिधी
Medical Strike : राज्यातील शासकीय परिचारिकांनी आज विविध प्रलंबित मागण्यांसाठी दोन तासांचे कामबंद आंदोलन करत शासनाचे लक्ष वेधले. सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत महाराष्ट्रभर अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये परिचारिकांनी कामातून अलिप्त राहत आंदोलन केले.
या आंदोलनामुळे काही ठिकाणी रुग्णसेवेवर मर्यादित परिणाम झाला, तर सकाळच्या वेळेत बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) उपचारासाठी आलेल्या रुग्णांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला.
मुंबईतील ग्रँड मेडिकल कॉलेज जे. जे. रुग्णालयासह छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातही परिचारिका आंदोलनात सहभागी झाल्या. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
सेवा प्रवेश नियम तातडीने अंतिम करावेत, रुग्णालयांचा आकृतीबंध मंजूर करावा, पदोन्नतीची प्रक्रिया गतिमान करावी तसेच रिक्त पदांची त्वरित भरती करावी, या प्रमुख मागण्यांसाठी परिचारिकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाला स्पष्ट इशारा दिला असून, मागण्यांवर लवकर निर्णय न झाल्यास राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
आजचे आंदोलन केवळ दोन तासांचे असल्याने अत्यावश्यक रुग्णसेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली नाही. मात्र, सकाळच्या वेळेत उपचारासाठी आलेल्या अनेक रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रतीक्षा करावी लागल्याचे चित्र अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये पाहायला मिळाले.
हेही पहा –

