Dailyhunt

Monsoon 2026: यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज, 'स्कायमेट'ने वर्तवली धोक्याची घंटा

Monsoon 2026: भारतात (India) २०२६ मध्ये मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज खासगी हवामान संस्था 'स्कायमेट'ने (Skymet) आज (मंगळवारी, ता ७) वर्तवला आहे.

जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी हंगामाच्या उत्तरार्धात ‘एल निनो’ (El Nino) या हवामान स्थितीमुळे पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे.

एल निनोचा परिणाम यंदा मान्सूनवर (Monsoon 2026) होणार असल्याचा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. २०२६ मध्ये सरासरीपेक्षा यंदा कमी मान्सून पावसाचा (Monsoon) अंदाज देखील ‘स्कायमेट’ने व्यक्त आहे. जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीत मान्सून पर्जन्यमान सरासरीच्या ९४ टक्के पावसाचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीत एल निनोची तीव्रता वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. जून महिन्यात मान्सून (Monsoon) तुलनेने स्थिर राहण्याची शक्यता असली, तरी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे. देशातील मध्य आणि उत्तर-पश्चिम भागांमध्ये पावसाची कमतरता जाणवू शकते, ज्याचा शेती आणि जलस्रोतांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. ‘भारतीय हवामान विभागा’कडून पुढील आठवड्यात मान्सून हंगामासाठीचा आपला पहिला अंदाज जाहीर करण्याची शक्यता आहे.

‘एल निनो’ आणि ‘ला निना’ म्हणजे काय?

एल निनो (El Nino): पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढणे, याला ‘एल निनो’ म्हणतात. याचा भारतीय मान्सूनवर नकारात्मक परिणाम होतो आणि पाऊस कमी होतो.

ला निना (La Nina): पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचे तापमान कमी होण्याच्या स्थितीला ‘ला निना’ म्हणतात, ज्यामुळे मान्सूनला बळकटी मिळते आणि पाऊस चांगला होतो.

हेही पहा :

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post